सुखाचा प्रवास, मोकळा श्वास; कोस्टल रोड अडीच वर्षांत पूर्ण होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला वेगवान बनवणाऱया आणि पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱया कोस्टल रोडचे काम सध्या वेगाने सुरू असून आतापर्यंत 36 टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गात प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंत जमिनीखाली प्रत्येकी 2 किमी लांबीचे 2 बोगदे 12.20 मीटरचा व्यास असणाऱया महाकाय ‘मावळा’ टनेल बोअरिंग मशीनच्या माध्यमातून खोदले जात आहेत. जुलै 2023 अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार असून मुंबईकरांचा ‘वेगवान प्रवास’ सुरू होणार आहे.

‘सुखाचा प्रवास, मोकळा श्वास’ असे घोषवाक्य असणाऱया कोस्टल रोडमध्ये प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतच्या 10.58 किमीचा एकूण मार्ग बांधला जात आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड खबरदारी घेऊन कोस्टल रोडचे काम अविरतपणे सुरू आहे. एकूण मार्गात 3 आंतरबदल व 4 वाहनतळांचा समावेश असून आतरबदलांची लांबी 15.66 किमी इतकी आहे. प्रकल्पात तयार होणाऱया पादचारी मार्गाची लांबी 8.5 कि.मी. तर समुद्र भिंतीची लांबी 7.47 किमी आहे. या प्रकल्पात पुलासाठी देशातील पहिलीच एकलस्तंभी पाया आणि सकार्डो वायुवीजन यंत्रणा बसवण्यात येणार आहे.

या रोडच्या कामात प्रियदर्शनी पार्क येथून समुद्राच्या खालून जाऊन मलबार हिल टेकडीखाली बोगदा खणला जात आहे. या शिवाय पाईल्स, पुलाचे स्तंभ, पुलासाठी लागणारे गर्डर, बोगद्यासाठी प्रवेशासाठी असणारे रॅम्प, आरसीसी बॉक्स अशी कामे मोठय़ा प्रमाणावर सुरू असल्याचे कोस्टल रोडचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी सांगितले.

असे आले कामात ‘स्पिडब्रेकर’!

  • कोस्टल रोडचे काम 13 ऑक्टोबर 2018 मध्ये सुरू करण्यात आले. मात्र मुंबई उच्च न्यायालयात पर्यावणाचे कारण देत ‘कोस्टल विरोधात’ याचिका दाखल करण्यात आल्यामुळे न्यायालयाकडून 16 जुलै 2019 ला कामाला स्थगिती देण्यात आली.
  • मात्र सर्वोच्च न्यायालयाने ‘मुंबईत वाढलेली वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड आवश्यक असल्या’चे सांगत 17 डिसेंबर 2019 रोजी स्थगिती उठवल्याने 18 डिसेंबर 2019 पासून पुन्हा काम वेगाने सुरू करण्यात आले.
  • जुलै 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते. मात्र कोरोनामुळे कोस्टल रोडच्या कामावर काही मर्यादा आल्यामुळे काम पूर्ण होण्याचा कालावधी सहा महिन्यांनी वाढला आहे. हे काम आता 2023 अखेर पूर्ण होणार आहे.

लाटांपासून बचाव, समुद्री जिवांचे संरक्षण

कोस्टल रोडच्या कामात एकूण भरावापैकी 100 हेक्टर भराव टाकण्यात आला आहे. भराव टाकण्याचे काम 90 टक्के तर समुद्र संरक्षक भिंत बांधण्याचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. समुद्र भिंत बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱया 4 ते 5 टनांच्या महाकाय दगडांमुळे लाटांचा प्रभाव कमी होत असून दगडांतील पोकळ्यांमुळे सागरी जिवांचे संरक्षणही होत आहे.