विमानतळावरून 51 कोटी 94 लाखांचे कोकेन जप्त

सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून 51 कोटी 94 लाखांचे कोकेन जप्त केले. कोकेन तस्करी प्रकरणी एका परदेशी नागरिकाला हवाई गुप्तचर विभागाने अटक केली. यंदाच्या वर्षामधील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रग तस्करीचे प्रकार होऊ नयेत याची खबरदारी घेण्यात आली आहे. एक परदेशी व्यक्ती ड्रग घेऊन येणार असल्याची माहिती हवाई गुप्तचर विभागाला मिळाली. त्या माहितीनंतर आज हवाई गुप्तचर विभागाने विमानतळावर सापळा रचला. सापळा रचून एकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या साहित्याची झडती घेतली. चार बॉक्समधून कमरेच्या पट्ट्यातून आणि कॉलरमधून पांढऱ्या रंगाची पावडर जप्त केली. ती पावडर कोकेन असल्याचे उघड झाले. जप्त केलेल्या कोकेनची किंमत सुमारे 51 कोटी 94 लाख रुपये इतकी आहे.