Cockroach Janta Party कॉक्रोज जनता पार्टीचे X अकाऊंट अचानक बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील 30 वर्षीय तरुण अभिजीत दीपके या तरुणाने सोशल मीडियावरून कॉक्रोच जनता पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर या पक्षाच्या अकाऊंटला तरुणाईचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत होता. अवघ्या चार दिवसात या पक्षाच्या इंस्टाग्राम अकाऊंटने फॉलोअर्सच्या बाबतीत भाजपच्या अधिकृत इंस्टाग्राम अकांऊटलाही मागे टाकले. त्यामुळे देशभर या पक्षाची चर्चा सुरू आहे. असे असतानाच आता या पक्षाचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे.

कॉक्रोच जनता पार्टीच्या ट्विटर अकाऊंटला गेल्या चार दिवसात दोन लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी फॉलो केले होते. गुरुवारी सकाळी कॉक्रोज पार्टीच्या इंस्टा हँडलने फॉलोअर्सच्या बाबतीत भाजपच्या अधिकृत हँडलला मागे टाकल्यानंतर संपूर्ण देशभरात त्याची जोरदार चर्चा झाली. दरम्यान या पक्षाचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी त्यांचे अधिकृत अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा देखील गुरुवारी केला होता. त्यानंतर काही वेळातच पक्षाचे X अकाऊंट सस्पेंड करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी देशातील तरुणांना उद्देशून झुरळ संबोधले होते. या संदर्भाने उपरोधिक स्वरूपात सदरील पक्षाची सोशल मीडियावर स्थापना झाली असून तरुणांना ही कल्पना प्रचंड आवडली आहे. मूळचा छत्रपती संभाजीनगर येथील असलेल्या अभिजीत दीपके याने हा पक्ष स्थापन केला आहे. या पक्षात सामील होण्यासाठी प्रमुख अट म्हणजे तुम्ही सुशिक्षित बेकार असला पाहिजे ही आहे.