गतविजेती कोको गॉफही हरली

न्यूयॉर्क, दि. 2 (वृत्तसंस्था)- कार्लोस अल्काराज आणि नोव्हाक जोकोविच यांना पराभवाचा धक्का बसल्यानंतरही अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत खळबळजनक निकालांची मालिका कायम आहे. गतविजेती आणि यजमान अमेरिकेची स्टार टेनिसपटू कोको गॉफला महिला एकेरीच्या तिसऱयाच फेरीत हार सहन करावी लागली. आपल्याच देशाच्या एमा नवारो हिने तिला 6-3, 4-6, 6-3 असे हरविले.

तृतीय मानांकित 20 वर्षीय कोको गॉफला यंदाही जेतेपदाची प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र तिच्या पराभवामुळे टेनिस जगताला मोठा उलटफेर बघायला मिळाली. कोकोने पहिला सेट गमावल्यानंतर दुसरा सेट जिंकून लढतीत पुनरागमन केले होते. मात्र एमाने तिसऱया व निर्णायक सेटमध्ये बाजी मारत विजयावर शिक्कामोर्तब केले. कोको गॉफला लढतीत 19 दुहेरी चुका करणे खऱया अर्थाने भोवले. ही चुरशीची लढत दोन तास 12 मिनिटांपर्यंत रंगली. आता उपांत्यपूर्व लढतीत एमा नवारो ही पाउला बाडोसाशी भिडेल.

झ्वेरेव, फ्रिट्झ, टियाफो, सबालेंका उपांत्यपूर्व फेरीत
अमेरिकन ओपनच्या पुरुष एकेरीत जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव, अमेरिकेचा टेलर फ्रिट्झ व फ्रान्सिस टियाफो यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. याचबरोबर महिला एकेरीत आर्यना सबालेंबा हिनेही टॉप-8मध्ये प्रवेश केला.

बोपन्ना-एब्डेन जोडी पराभूत
हिंदुस्थानचा स्टार खेळाडू रोहन बोपन्ना व त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डेन या जोडीचा पुरुष दुहेरीच्या तिसऱया फेरीत पराभव झाला. या जोडीला तिसऱया फेरीत मॅक्सिमो गोंजालेज व आंद्रेस मोल्टेनी या अर्जेंटिनाच्या जोडीने 6-1, 7-5 असे हरविले.