आचारसंहिता पथकाची दहशत, सभापती कार्यालयातील बोर्डवर कागद चिकटवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नांदेड

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्याच दिवशी आचारसंहिता चालू झाली. या आचारसंहितेनुसार शहरातील अवैध राजकीय जाहिराती, लेखन, भित्तीपत्रके काढून टाकण्यात आली. परंतु या आचारसंहिता पथकाने जिल्हा परिषदेत जावून सभापतींच्या कक्षातील सभापतींच्या नामावलीच्या बोर्डावर चक्क कागद चिकटवले. सभापतींचा कक्ष आणि त्यातील मजकूर हा आचारसंहितेच्या कक्षेत येत नाही. परंतु नांदेड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापतींना मात्र आचारसंहिता पथकाच्या दहशतीस सामोरे जावे लागले.

याबाबत अधिक माहिती अशी की, आचारसंहिता पथकाच्या गच्चे नावाच्या सदस्याने नांदेड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापतींच्या कक्षात जाऊन सभापतींच्या नामावलीच्या बोर्डावर कागद चिकटविण्याचे आदेश दिले. हे कागद चिकटवले नाहीत तर तुमच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होईल, असा दमही त्यांनी दिला. त्यांच्या आदेशानुसार अर्थ विभागाचे कर्मचारी राघवेंद्र मदनूरकर, पी. पी. कनकदंडे, सदाशिव घोगरे, शिवाजी वैद्य आदींनी त्यांना जिल्हा परिषदेचा सभापती कक्ष आचारसंहितेच्या कक्षेत येत नसल्याचे सांगितले, तरीही कर्मचाऱ्यांना कागद चिकटवण्याची सक्ती करण्यात आली. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी नामावलीच्या बोर्डावर कागद चिकटविले.

आता जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, आचारसंहिता काळात जिल्हा परिषदेची अधिसभा घेण्यासही परवानगी आहे, असे असताना सभापती कक्षातील मजकूर आचारसंहितेच्या कक्षेत कसा येऊ शकतो, असा प्रश्नही धनगे यांनी विचारला आहे. सभापती कक्षात झालेल्या या प्रकाराबाबत नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर यांनाही माहिती दिली आहे. याबाबत आपण माहिती घेऊन चर्चा करू, असे अंबेकरांनी सांगितले. तथापि आजपर्यंत त्यांनी कोणतीही माहिती घेतली नाही आणि कारवाईही केली नाही. आता साहेबराव धनगे यांची अशी मागणी आहे की, आचारसंहितेचा अतिरेक करून सभापती कक्षातील बोर्डावर कागद चिकटवण्याची सक्ती करणाऱ्या पथकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा. याबाबत जिल्हाधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.