ठाणे लोकसभा मतदारसंघातील मिंधे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा प्रचार करण्यासाठी थेट मंदिरांमध्ये सभा घेतल्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला आहे. याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
उमेदवारांनी आपला प्रचार करताना प्रार्थनास्थळांचा आणि मंदिरांचा वापर करू नये अशा सूचना निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याच उमेदवाराला मंदिराच्या आवारात प्रचार सभा घेता येत नाही. मात्र नवी मुंबईत मिंधे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी सीवूड येथील शनेश्वर मंदिर आणि नेरुळ पूर्व भागात असलेल्या अयप्पा मंदिरात ‘मिसळ पे चर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी कार्यक्रम सुरू असताना सभाही घेण्यात आल्या. दोन्ही मंदिरांचा प्रचाराचे व्यासपीठ म्हणून उपयोग करण्यात आला. या सभांचे आयोजन भाजपच्या जिल्हा मोर्चाचे अध्यक्ष दत्ता घंगाळे, महामंत्री विजय घाटे, मिंधे गटाचे दिलीप घोडेकर, विजय माने यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या ठिकाणच्या सभांमध्ये मिंधे गटाचे विजय नाहटा यांनी उपस्थितांना नरेश म्हस्के यांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.
नरेश म्हस्केंची उमेदवारी रद्द करा !
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हाप्रमुख यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या दोन्ही मंदिरांमध्ये सभांचे आयोजन करणारे पदाधिकारी आणि त्या सभेत भाषण करणारे वक्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा आणि मिंधे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणीही विठ्ठल मोरे यांनी केली आहे.