चंद्रपूर गारठले; तापमान 5 अंशांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cold-wave

यंदा थंडी उशिरा म्हणजे डिसेंबरचा शेवटचा आठवड्यात आली. मात्र, थंडीने दाखल झाल्यावर चंद्रपूरातील 25 वर्षातील निचांकी तापमान गाठले आहे. उच्चांकी तापमानासाठी ओळखले जाणारे चंद्रपूर 25 वर्षातील नीचांकी तापमानावर आले आहे. उत्तर हिंदुस्थानातील थंडीची लाट आता राज्यातही येत आहे. चंद्रपूरसह विदर्भात थंडीच्या लाटेने नागरिक गारठले आहेत. नागपूर-चंद्रपूर-गोंदियामध्ये तापमान 5 अंशापर्यंत खाली उतरले आहे.

या भागात तीन दिवसांपूर्वी पावसाळी वातावरण होते. ढग दूर झाल्यावर थंडी दाखल झाली आहे. येत्या काही दिवसात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. प्रखर उन्हासाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपुरात नागरिक थंडीचा आनंद घेत आहेत. रात्रीच्या सुमारास उघड्यावर झोपणाऱ्या नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. थंडीमुळे रस्त्यावरील वर्दळ कमी झाली आहे. थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार घेण्यात येत आहे. चंद्रपुरात थंडी कमी दिवस असते. त्यामुळे नागरिक थंडीचा आनंद घेत आहेत. या हवामानात दरवर्षी संक्रांतीच्या काळात झपाट्याने बदल होत तापमान वाढत जाते. यंदा थंडी दाखल होण्यास उशीर झाल्याने जानेवारी महिन्यातही थंडी राहण्याची शक्यता आहे.