पाण्याच्या पाइपलाइनला शेकोटीची ऊब, कश्मीरात 28 वर्षांतील रेकॉर्ड ब्रेक थंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली 

जम्मू-कश्मीरची उन्हाळी राजधानी श्रीनगरमध्ये थंडीने मागील तीन दशकांतील सर्वाधिक थंडीचे रेकॉर्ड मोडले आहेत. यंदाचा डिसेंबर महिना सर्वाधिक हुडहुडीचा ठरला असून बुधवारी रात्री पारा उणे 7.6 अंशापेक्षा खाली पोहोचला होता. गोठवणाऱ्या थंडीने डल तलावासोबतच नागरी वस्त्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाइनमधील पाणीही गोठले आहे. 7 डिसेंबर 1990 ला श्रीनगरमध्ये पारा उणे 6.8 अंशांवर होता. त्यानंतर यंदा प्रथमच पारा त्यापेक्षाही खाली आला आहे. श्रीनगर आणि परिसरातील नागरी वस्त्यांना पाणीपुरवठा करणाऱया पाईपलाइनमधील पाणीही थंडीमुळे गोठले आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे पाण्याचे हाल होत आहेत. काही जणांनी तर पाईपमधील गोठलेले पाणी वितळविण्यासाठी पाईपलाइनजवळ चक्क शेकोटीची ऊब दिली.

राज्यात थंडीची लाट
पुणे : उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका गुरुवारी चांगलाच वाढला. या भागात थंडीची लाट आल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. राज्यातील किमान तापमानाची नोंद नाशिक येथे 5.7 अंश सेल्सियस एवढी झाली.

मुंबईचा पारा बारावर
मुंबईतही जबर थंडी पडली असून तापमान 12.4 अंश सेल्सिअस एवढे उतरले.

कुठे, किती?
अलिबाग 15.6, रत्नागिरी 19.4, पुणे 10.0, जळगाव 12.0, कोल्हापूर 19.8, महाबळेश्वर 14.0, मालेगाव 8.6, सांगली 16.3, सातारा 15.0, सोलापूर 16.6, धाराशीव 13.9, संभाजीनगर 10.8, परभणी 14.0, नांदेड 13.0, अकोला 11.2, अमरावती 10.4, बुलढाणा 13.0, ब्रह्मपुरी 14.5,चंद्रपूर 11.6, गोंदिया 11.6, नागपूर 10.9