अकरावीच्या ऍडमिशनचा यंदाही ‘काला’, हुशार विद्यार्थ्यांमध्ये फाईट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंतर्गत मूल्यमापनामुळे दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या वाढली असली तरी अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे यंदा अकरावी प्रवेशाचा काला होणार आहे. मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने अकरावीच्या जागांमध्ये वाढ होणार नसल्याचे सांगितले आहे. त्यातच यंदा मुंबई विभागात 2 लाख 70 हजारांहून जास्त विद्यार्थी हे प्रथम श्रेणी व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे नामांकित कॉलेजमधील अनुदानित जागांबरोबरच विनाअनुदानित जागांवरील प्रवेश मिळविण्यासाठी हुशार विद्यार्थ्यांमध्ये टफ फाइट होणार हे निश्चित आहे.

आजपासून विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग 2 म्हणजेच कॉलेज पसंतीक्रम नोंदविता येणार असून विद्यार्थ्यांनी मागील वर्षीचा कट ऑफ व आपल्याला मिळालेले गुण लक्षात घेऊन पसंतीक्रम नोंदवायाचे आहेत. कॉलेज पसंतीक्रम भरण्यासाठी 22 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

कॉलेज पसंतीक्रम भरताना विद्यार्थ्यांनी त्यांना ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे अशा कॉलेजचा पर्याय सर्वप्रथम भरायचा आहे, असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे. गेल्या वर्षी अकरावीचे ऑनलाइन प्रवेश पूर्ण झाल्यानंतरही सुमारे 70 हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे यंदा जागा वाढवून मिळणार की नाही याविषयीचे चित्र अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही. मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर आणि अमरावती या पाच महानगरपालिका क्षेत्रात अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठीची प्रक्रिया नुकतीच सुरू करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रक्रियेतील भाग पहिला भरण्यासाठीची मुदत संपली असून आजपासून कॉलेज पसंतीक्रम नोंदविण्यास सुरूवात झाली आहे. मात्र विद्यार्थ्यांना प्रवेश हवा असलेल्या कॉलेजमध्ये नेमक्या किती जागा उपलब्ध आहेत याची माहिती आतापर्यंत शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात न आल्याने विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत.

मुंबई, पुण्यात चुरस

मुंबई आणि पुणे या दोन महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या काही नामांकित ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यास विद्यार्थ्यांचा कल असतो. त्यामुळे यंदा या कॉलेजमध्ये नेमक्या किती जागा उपलब्ध आहेत हेच जाहीर करण्यात आले नसल्याने प्रवेशाचा दुसरा भाग भरताना विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. मुंबई विभागातून दहावीच्या परीक्षेत तब्बल दोन लाख 93 हजार 478 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 80 ते 95 टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 70 हजार 790 इतकी आहे. त्यामुळे नामांकित कॉलेजमध्ये प्रवेशाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.
करीअर निवडताना मिळालेल्या गुणांकडे डोळसपणे पहा
दहावी, बारावीनंतरचे करीअर निवडताना विद्यार्थ्यांनी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे मिळालेल्या गुणांकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. अकरावीची सीईटी परीक्षा रद्द करत दहावीच्या गुणांच्या आधारे पुढील अभ्यासक्रमाचे प्रवेश घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. बारावीनंतरचे काही पारंपरिक पदवी आणि पदविका अभ्यासक्रमदेखील याच पद्धतीने बारावीच्या गुणांवर दिले जाणार आहेत. परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापनाद्वारे मिळालेल्या गुणांकडे विद्यार्थी आणि पालकांनी अधिक सजगतेने पाहण्याची गरज असल्याचे समुपदेशक जयवंत कुलकर्णी यांनी सांगितले. करीअरची निवड करताना खबरदारी म्हणून विद्यार्थी, पालकांना त्यांनी काही टीप्सही सांगितल्या आहेत.

शाळा सोडल्याचा दाखला जमा करण्यास मुदत

दहावीच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला अद्याप मिळालेला नाही, तर काहींनी तो शाळेकडून घेतलेला नाही. अशा विद्यार्थ्यांना अकरावीचा ऑनलाइन अर्ज भरताना शाळा सोडल्याचा दाखल जमा करण्यास मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थी गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर मिळालेला प्रवेश कन्फर्म करताना शाळा सोडल्याचा दाखला जमा करू शकतात. नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट जमा करण्यासाठीही मुदत देण्यात आली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत देण्यात आली होती. यंदा मात्र विद्यार्थ्यांना त्यासाठी कोणताही वाढीव वेळ दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग 1 भरतानाच जात प्रमाणपत्र अपलोड करावे लागणार आहे.

शिक्षणमंत्र्यांनी शब्द पाळावा

दहावीचा निकाल वाढल्याने शिक्षण विभागाने यंदा कॉलेजना जागा वाढवून द्यायला हव्यात. शिक्षणमंत्र्यांनी एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही असे म्हटले होते. विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढल्याने प्रत्येकाला नामांकित कॉलेजमधील अनुदानित जागांवर प्रवेश मिळणे कठीण आहे. कॉलेजना जागा वाढविण्याची परवानगी मिळाली तर ती सेल्फ फायनान्स आणि विनाअनुदानित जागांसाठी मिळेल. या जागांसाठी अधिकचे शुल्क भरून प्रवेश घेण्याशिवाय पालकांसमोर दुसरा पर्याय नाही- डॉ.तुकाराम शिवारे, अध्यक्ष, नॉन गर्व्हन्मेंट कॉलेज प्रिन्सिपल असोसिएशन.

जागा वाढण्याची शक्यता कमीच

मुंबई विभागात अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या जागांध्ये वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. ऑनलाइन प्रवेशाच्या जागा गेल्या वर्षीप्रमाणेच आहेत. उपलब्ध जागांमध्ये काही बदल असल्यास त्याची निश्चित माहिती दिली जाईल- संदीप संगवे, शिक्षण उपसंचालक, मुंबई

प्रवेशापूर्वी हे नक्की करा

  • मिळालेल्या गुणांपैकी आपल्याला नेमके किती गुण मिळणे शक्य होते याचा प्रथम स्वतःशी प्रामाणिक राहून वास्तव विचार करा. वाढीव गुण मिळाले आहेत त्याआधारे मिळतो प्रवेश तर सध्या घेऊ, झेपले तर ठीक, नाहीतर नंतर शाखेत बदल करू असा विचार न करणेच हिताचे राहील.
  • अभ्यासक्रम निवडीपूर्वी त्यातून पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या व्यक्तींशी सविस्तर चर्चा करावी. त्यातील विषय, अभ्यासाचे तंत्र व स्वरूप, आवर्जून कराव्या लागणाऱ्या गोष्टी, पूर्वतयारी यांची माहिती घ्यावी.
  • ज्या विषयांची सर्वाधिक आवड आणि उत्तम आकलन होते, आपले छंद-कौशल्ये कोणते आहेत, निवडलेल्या शाखेतील संधी, धोके आणि व्यावसायिक समाधान यांचा विचार करा.
  • शक्यतो जवळचे कॉलेज निवडा, जेणेकरून प्रवासाचा वेळ, थकवा आणि पैशांची बचत होऊ शकते.
  • करीअरशी संबंधित मुबलक प्रमाणात विविध वृत्तपत्रे, विद्यापीठांच्या वेबसाइट्स, यातून उपलब्ध असलेली छापील माहिती तसेच शासनाच्या महाकरीअर पोर्टलवरील करीअर्स, कॉलेजेस, प्रवेश परीक्षा आणि शिष्यवृत्त्या यांची माहिती नक्की अभ्यासावी.
  • शिक्षण विभागाच्या www.mahacareerportal.com या पोर्टलवर जरूर भेट द्यावी.