सायरन वाजवत महाविद्यालयीन युवती रुग्णवाहिकेतून गरब्याला; रुग्णवाहिकेची तीन वाहनांना धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सायरन वाजवत निघालेल्या रुग्णवाहिकेतून चक्क वैद्यकीय महाविद्यालयीन युवती गरब्याला जात असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री उघडकीस आला. विशेष म्हणजे या रुग्णवाहिकेने चारचाकी वाहनासह दोन दुचाकींना धडक दिली. या घटनेनंतर जुना राजवाडा पोलिसांनी कोणतीही नोंद न करता रुग्णवाहिका चालकाला समज देऊन सोडून दिले. या घटनेने खळबळ उडाली आहे.

काल रविवारी (दि. 15) रात्री 10च्या सुमारास हॉकी स्टेडियमसमोरून गोखले महाविद्यालयाच्या दिशेने एक भरधाव रुग्णवाहिका (एमएच 09 एफएल 6709) सायरन वाजवत निघाली होती. वाटेत या रुग्णवाहिकेने चारचाकी आणि दोन दुचाकींना धडक दिली. संशय आल्याने नागरिकांनी पाठलाग सुरू केला. काही अंतर पाठलाग करत नागरिकांनी रुग्णवाहिका अडवली. त्यावेळी चालकाशेजारी दोन युवती बसल्याचे आढळून आले. यावेळी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. नागरिकांनी चालकाला जाब विचारत आत काय आहे ते दाखविण्याची मागणी केली. चालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मात्र, नागरिकांच्या रेटय़ामुळे चालकाने रुग्णवाहिकेचा मागील दरवाजा उघडला. त्यावेळी आत गरबा खेळण्यासाठी जाणाऱया तरुणी दाटीवाटीने बसल्याचे आढळून आले. या युवती वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असून, गरबा खेळण्यासाठी आम्ही जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नागरिकांनी तातडीने जुना राजवाडा पोलिसांना बोलावून घेतले. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.