
सोमवारी 24 जानेवारीपासून महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने राज्यातील पूर्व प्राथमिक ते 12वीपर्यंतच्या शाळा सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासंदर्भातल्या निर्णयास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडे शुक्रवारी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली. शाळांच्या पाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहेदेखील सुरू करण्यात यावीत, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी आज विभागाला दिले.
































































