बाई मी पुण्याची गं पुण्याची

>> शिरीष कणेकर

पल्लवी अकोलकर नामे पुण्याची भगिनी माझी महावाचिका आहे (ती वाचते आणि कहर म्हणजे तोंडानं कबूलही करते. वास्तविक, ‘‘आमचा गडीसुद्धा यांच्यापेक्षा कितीतरी चांगलं लिहितो’’ असं तिनं म्हणायला हवं व ‘पुणेकर’ या बिरुदाला जागायला हवं). खरं सांगू, मलाही हे खरं वाटत नव्हतं. पुण्यात माझं कौतुक करणारं कोणी कसं असू शकेल? जगाचा तिरस्कार करणारी व भीडमूर्वत न ठेवता तो व्यक्त करणारी माणसंच पुण्यात राहू शकतात. म्हणून दिलीप प्रभावळकरांसारख्या शांत सौजन्यमूर्तीला पुणेकरांनी आपल्यात राहू दिलंय याचं मला अतोनात आश्चर्य वाटतं. तसा लता मंगेशकरचादेखील पुण्यात लोकमान्य नगरमध्ये फ्लॅट आहे, पण तिथं स्थलांतरित होण्याची तिची हिंमत नाही. ‘‘अरे, असाल तुम्ही पार्श्वगायिका. अनेक पार्श्वगायिका आमच्याकडे एकेका पेठेतच पडल्यात. सदाशिव पेठेतच पार्श्वगायिकांची कॉलनी आहे.’’ असं भांडण उकरून काढतील अशी स्वरलतेला साधार भीती वाटत असावी.

पुण्यात पाऊल ठेवलं की, म्युनिसिपालिटीच्या उंदीर मारण्याच्या खात्याची माणसं आपला वेध घेतील अशी सतत धास्ती वाटत राहते. एका माणसाला तर मी ‘‘नाही नाही, मी उंदीर नाही. बघा मी बोलतोदेखील’’ असं सांगितलंदेखील. मग कळलं की, तो मुंबईचा होता व मला उंदीर मारणारा समजून भेदरला होता. ‘पिपात मेले ओल्या उंदीर’ या कवितेत बा. सी. मर्ढेकरांना अपेक्षित होते ते उंदीर आम्ही होतो की नव्हतो? नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, संभाजीनगर येथील माणसांना पुण्यात बिनधास्त फिरू देतात का हो? पुण्याचं एक वेगळं स्वतंत्र राज्य का बनवत नाहीत? पुण्यात प्रवेश करण्यासाठी पासपोर्ट, व्हिसा का लागू करत नाहीत? सुरेश कलमाडींना पुण्याचे पहिले मुख्यमंत्री करा. केदार जाधव क्रीडा मंत्री. शिवाय ‘गुडी-गुडी, गुलू-गुलू’ हे नवीन मंत्रीपद निर्माण करून त्यावर सदा हसऱ्या चेहऱ्याच्या सुधीर गाडगीळला बसवा.

एका पुण्याच्या वाचकाचा मला फोन आला होता (पुण्याच्या फोनची बेलदेखील वेगळी वाजते व पुण्याहून वायरमधून आलेल्या चिकटपणामुळे फोन हाताला चिकटतो).

‘‘मी तुमचा पंटर फॅन आहे. मला तुम्हाला काही करून भेटायचंय,’’ तो म्हणाला. वास्तविक ही भाषा पुणेकराच्या तोंडी शोभत नव्हती.

‘‘या की मग.’’ पुण्याच्या सौजन्याला मी मुंबईच्या अगत्यानं उत्तर दिलं.

‘‘कुठं मुंबईला?’’ तो फोनमधून किंचाळला. नुसता किंचाळला असता तरी मला ऐकू आलं असतं. मुंबई म्हणजे जणू चंद्रावर होती.

‘‘अहो, नोकरीधंद्याच्या निमित्तानं माणसं रोज पुणे-मुंबई अप-डाऊन करतात. तुम्ही एकदा येऊ शकत नाही? तुम्ही माझे पंटर फॅन आहात ना? तुम्हाला मला काही करून भेटायचंय ना?’’ माझ्या नकळत माझा आवाज चढला होता. अवदसा आठवली की, असंच होतं. ‘‘त्यापेक्षा तुम्ही पुण्याला या. माझा नंबर आलाच असेल. पुण्यात आल्यावर त्यावर फोन करा. मी माझा पत्ता व कसं यायचं ते सांगीन. रिक्षा करून तिथं या. आपण मस्तपैकी एक कप चहा पिऊ व दोन तास गप्पा मारू.’’ त्यानं पर्यायी योजना सांगितली.

‘‘एक कप चहा दोघात का?’’ हे विचारण्याची खुमखुमी मी कष्टानं दाबली. कारण ‘‘अर्थातच’’ हे उत्तर त्याच्याकडून आलं असतं. मलाच काही करून त्याला भेटायचंय असा समज त्यानं करून घेतला असावा. शिवाय त्यानं पाजला नाही तर (कोणाच्या दारात) मला अर्धा कप चहाही मिळणार नाही अशी त्याची रास्त अटकळ असावी. सारी दुनिया एक तरफ और पुण्यनगरी एक तरफ. त्यांचं प्रेमदेखील निवडुंगासारखं असतं. काटेरी!

चारचौघात कुठं बोलू नका, पण माझा जन्मही पुण्याचाच आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुण्याचा होता हे त्यांच्याकडून ऐकून मी अभावितपणे बोलून गेलो – ‘‘माझाही.’’
बाळासाहेबांनी चष्म्यातून क्षणभर माझ्याकडे रोखून पाहिले व एकच शब्द उच्चारला, – ‘‘तरीच.’’ म्हणजे काय हे मला कळलं व पुणेकरांनाही कळलं असेल.

पल्लवी अकोलकरनं मला विचारलं, ‘‘तुमचा जन्म लक्ष्मी रोडवरच्या गोखले प्रसूतिगृहातला ना?’’

‘‘हो.’’ मी म्हणालो. ‘‘तिथं काय माझा पुतळा उभारलाय का? की बाळंत होणाऱ्या प्रत्येक बाईला संतती देदीप्यमान व्हावी म्हणून माझा फोटो देतात? शिर्डीला साईबाबांचा मिळतो तसा. पेणच्या जकातनाक्यावर माझ्या सासूचाही तोंड मिटलेला फोटो देतात म्हणे.

पल्लवी खळखळून हसली. मी लिहिलं की, वाचायचं व मी बोललो की, हसायचं असं तिनं व्रत घेतलं असावं. ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व’ वगैरे काय काय ती मला म्हणाली. (कारण ती मूळची नाशिकची होती. म्हणजेच पुण्यात उपरी होती). वास्तविक हे वर्णन फक्त पु.लं.ना लागू होत होतं. त्यांच्या नंतर हे आसन रिकामं होतं. मुकुंद टाकसाळे त्यावर बसायचा निष्फळ प्रयत्न करीत असतो. हे महात्मा गांधींच्या जागी राहुल गांधी किंवा लीला गांधी यांना बसवण्यासारखं आहे.

पल्लवी मावशीनं मला सुग्रास भोजन दिलं. मधुमेहानं (यालाच शिकलेली व इंग्रजीत बोलणारी माणसं ‘डायबेटिस’ म्हणतात). माझ्या संपूर्ण देहाचा बेकायदेशीर कब्जा घेतल्याचं कळल्यावरून पुणेकरांच्या चिथावणीवरून तिनं माझा खात्मा करण्याचा घाट तर घातला नसेल? कारण पानात पुरणपोळी, जिलबी व बंगाली खीर-कदमसमान खोबऱ्याच्या लाडूसारखं भन्नाट काहीतरी होतं. एकातून बचावलो तर दुसरा गोडाचा प्रकार मला गारद करील अशी चाल असावी. नशीब खंडोबल्लाळाचे राखेनं तोबरे भरले होते तसे तिनं माझे साखरेनं तोबरे भरले नाहीत.

गंमत केली हो! पुणे आणि पुणेकर यांची हक्काने गंमत नाही करायची तर कोणाची करायची? पुणं आमचं आहे, बच्चू! पर्वती हिमालयापेक्षा उंच आहे एवढं म्हटलं की, पुणेकर खूश. शेर्पा तेनसिंग व एडमंड हिलरी एव्हरेस्टवर चढले तसे पर्वतीवर चढायला धजावले का? रॉजर फेडररनं एवढी उत्तुंग कारकीर्द केली, पण पुण्याच्या टेनिस कोर्टवर तो पाय ठेवू शकला का? गोल्फपटू ‘टायगर’ वुडस्नं इतकी लफडी केली, पण पुण्याच्या पोरींच्या वाटेला जायची त्यानं हिंमत केली का..?

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या