संतती

>> शिरीष कणेकर

मी मुलासाठी स्थळं बघत होतो, तो माझ्यासाठी वृद्धाश्रम बघत होता. कोणीतरी हे मला पाठवलं आणि मी आतून कुठं तरी हलल्यासारखा झालो. ते खरं वाटू नये इतकं खरं होतं. अनेक हतबल बाप याची साक्ष द्यायला पुढे येतील. मुलांचा त्यांच्यावर वचक असेल तर कदाचित घाबरून नाहीही तोंड उघडणार. हीच शक्यता जास्त आहे.

मुलं मोठी झाली. कर्तृत्ववान निपजली. पाच-पाच आकडय़ात पगार घेतायत. कामानिमित्त परदेशवाऱ्या करतायत. फोनवरून कोणाशी न कोणाशी सतत इंग्लिशमधून बोलतायत. बाप जनता सहकारी बँकेत क्लार्क होता. निवृत्तीनंतर कोणाकडे तरी हिशेब लिहायला जायचा. महिना पाच हजार रुपये पगार. आपण मुलावर भार होतोय असं त्याला व मुख्य म्हणजे स्वतःला वाटू नये यासाठी झेपत नसताना नोकरी करायची. घरातली कामवाली बाई आपल्यापेक्षा जास्त कमावते या वस्तुस्थितीकडे कानाडोळा करीत बाप पाय ओढत रोज कामावर जातो. मुलाचे मित्र किंवा ऑफिसातले सहकारी ओल्या पार्टीसाठी घरी आले तर काही तरी काम काढून घरातून बाहेर पडायचं. आपल्यामुळे मुलाला लाज यायला नको. मोठ्या अधिकाऱ्याचा बाप यकःश्चित कारकून…

शिक्षण, नोकरीधंदा, आमदनी व एकूणच समाजातील स्थान यावरून पोरं बापाची किंमत करतील हे दिवस इतक्या लवकर पहायला लागतील असं वाटलं नव्हतं. पांढरपेशा समाजातील शिकलेल्या कुटुंबातील बाप मुलाला झोपडपट्टीत ऐकायला मिळणार नाहीत अशा शिव्या घालतोय व पदवीधर मुलगा उलटून बापाला जास्त अर्वाच्च शिव्या देतोय हे याचि देही याचि डोळा पाहून व ऐकून आपलं आता या जगात काम नाही, हे मला नव्यानं व अधिक प्रकर्षानं जाणवलं. ‘चल उड जा रे पंछी, अब ये देस हुवा बेगाना…’

मी एका मित्राकडे गेलो होतो. त्याच्या कॉलेजात जाणाऱ्या मुलाला मी सहज विचारलं- ‘‘काय म्हणतंय कॉलेज?’’

‘‘मी सांगतो.’’ त्याच्याऐवजी मित्र म्हणाला, ‘‘त्याचं काय आहे, पहिला पिरियड असतो ना, त्याची त्याला खास शिकवणी आहे. त्यामुळे कॉलेजात त्यासाठी जायची गरज नाही. दुसरा पिरियड आहे, त्या प्राध्यापकाला शिकवताच येत नाही. त्यामुळे त्या तासाला बसणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. वेस्ट ऑफ टाइम, यू सी. तिसऱ्या पिरियडचं वेगळंच आहे…’’

‘‘स्टॉप इट!’’ बापाचा उपरोध सहन न होऊन मुलगा ओरडला, ‘इफ यू डोंट नो एनीथिंग, डोन्ट टॉक!’’

मीच चपराक बसल्यासारखा गप्प झालो. बापाची ही हालत तर माझं त्यानं काय केलं असतं? मुलाच्या आईनं झटक्यात विषय बदलला. त्यामुळे नवऱ्याची अवहेलना लपून राहील असं तिला का वाटलं कुणास ठाऊक. शिवाय मुलगा पुन्हा लगेच नव्यानं बापाचा उपमर्द करणार नाही याची काय गॅरेंटी? त्या बापानं लहानपणी खूप लाड केले असतील, आजारपणात रात्र रात्र उशाशी बसून काढली असेल, कॉलेजच्या व शिकवणीच्या फिया भरत असेल, रात्री उशिरा घरी आल्यावर निमूटपणे दरवाजा उघडत असेल, तोंडाला येणारा सिगारेटचा वास आपल्याला येतच नाही असं भासवत असेल, पॉकेटमनी सतत पुरवत असेल, सो व्हॉट? त्यामुळे कळत नाही त्या गोष्टीत नाक खुपसण्याचा त्याला अधिकार प्राप्त होतो की काय? नॉनसेन्स. ही शुड माइंड हिज ओन बिझिनेस…

परवा मी एका बाप-लेकाचं उद्बोधक संभाषण ऐकलं. त्या शिळोप्याच्या गप्पा होत्या.
मुलगा – आपल्याकडे माणसाचं सरासरी वयोमान काय आहे?’
बाप – चौऱ्याहत्तर – पंचाहत्तर.
मुलगा – आणि निवृत्तीचं वय?
बाप – अठ्ठावन्न.
मुलगा – म्हणजे अठ्ठावन्न ते पंचाहत्तर या सतरा वर्षांची खाण्यापिण्याची व आरामात राहण्याची आर्थिक सोय त्यानं नोकरीच्या काळात करून ठेवायला हवी. कोणापुढे हात पसरायला नको.

कोणापुढे म्हणजे कोणापुढे हे कळल्यानं असेल कदाचित, बापाची बोलती बंद झाली. मुलगा कदाचित तात्विक चर्चा करीत असेल, पण बाप हबकलेला स्पष्ट दिसत होता. येणाऱ्या (किंवा ऑलरेडी आलेल्या) दिवसांचा हा ट्रेलर होता, बच्चू! मुलांना हात पसरायला न लावता त्यांच्या भवितव्याच्या सर्व सोयी मुकाट्यानं करून ठेवणारा बाप स्वतःची तरतूद करायला विसरतो व लाथा खातो. फुटबॉलसारखा! पुढल्या पिढीतील पोरं कशी वागतायत हे पाहणं मनोरंजक असेल, पण त्यासाठी तुम्ही आम्ही कुठं असणार आहोत? कुणी सांगावं, त्या पिढीतील शहाणे झालेले बाप खरोखरच स्वतःची वेगळी तरतूद करून ठेवतील.

सूरज ना बदला, चाँद ना बदला, ना बदला रे आसमान, कितना बदल गया इन्सान

माझा पिटुकला नातू मला म्हणाला, ‘‘ग्रँडपा, माय डॅड इज द बेस्ट प्रोफेसर इन अमेरिका.’’

‘‘बघ अमर,’’ मी मुलाला म्हणालो, ‘‘काही मुलांना वडिलांचा किती अभिमान असतो.’’

माझ्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानंतर अमर अमेरिकेला परत जायला निघाला तेव्हा मी त्याला म्हणालो, ‘‘28 ऑगस्ट 1974 ला मी तुला प्रथम पाहिला व आज तुला मी बहुधा शेवटुंदा पाहतोय. पुढल्या वेळी येशील तेव्हा मी नसेन.’’

अमर काहीच बोलला नाही. ही इज नॉट अॅन इमोशनल फूल लाइक हिज फादर…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या