टिवल्या-बावल्या : यार दोस्त!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

मेलेल्या मांसाला लालचावलेला डुक्करतोंड्या. तुला काय वाटलं, आम्हाला कळणार नाही? चार नंबरवर विजय शंकरला खेळवण्याचे कटकारस्थान करता, कोंबडीचोरांनो? देशातले सगळे फलंदाज मेले काय?’

‘आम्ही कशाला मारू? ते आपल्या मरणानं मरतील. तुमच्यासारखे भ्याड कोल्हेकुई करत बायकोच्या पदराआड लपून बसतील, चिंधीचोर! आम्ही विजयला खेळवू, नाहीतर रायडूला खेळवू, नाहीतर पंतला खेळवू, नाही तर कार्तिकला खेळवू, नाहीतर पुजाराला खेळवू. आडवे याल तर कापून काढू.’

‘कापायला आम्ही काय बटाटे आहोत का? आमचे हात काही झेल सोडायला गेलेले नाहीत. अजिंक्य रहाणेचं नाव घेतलेत तर काय जीभ झडेल का?’

‘तुम्ही त्याचे गुण ओळखून त्याचे नाव घेताय की तो मुंबईचा आहे म्हणून त्याचं नाव घेताय? तुला आणि डी.आर.एक्स.ला क्रिकेटमधलं काही कळत नाही. पोट सुटलेला रवी शास्त्री कुठला. अजिंक्यचे वडील नाट्यनिर्माते आहेत. त्यांना सांगा की लेकाला आता शिवाजी मंदिरला नाटकाच्या बुकिंगला हरी पाटणकर व विद्यासोबत बसवा म्हणावं.’

मित्र – नट अविनाश खर्शीकरमध्ये (मी त्याला नटवर्य किंवा नटश्रेष्ठ म्हणावं ही त्याची छोटीशी इच्छा इतक्या वर्षांत मी पूर्ण होऊ दिलेली नाही. उद्या स्मिता तांबेला सौंदर्यवती म्हणायला सांगाल.) व माझ्यात रोज सकाळी टेलिफोनवर रंगणारा हा कलगीतुरा सामना आहे. विजय शंकरशी किंवा आणखी कोणाशीही आमचा दुरान्वयेही संबंध नाही, पण ऐकणाऱयाला असं वाटेल की दोन सिलेक्टर्स हमरीतुमरीवर आलेत. रहाणेनं बिचाऱयानं आमचं काही वाईट केलेलं नाही. कसोटी संघात उपकर्णधार आहे तो, पण त्याच्या निमित्तानं दिवसाची सुरुवात कशी खमंग थालीपिठासारखी होते हे मोलाचं. संभाषणाचा शेवट खदखदून हसण्यात झाला पाहिजे हा दंडक आम्ही कटाक्षानं पाळतो. या घरबसल्या बैठय़ा करमणुकीला तोड नाही. देणम् नस्ती, घेणम् नस्ती, नुसती धमाल मस्ती, कोणाला संघात घ्यायचं व कोणाला संघात घ्यायचं नाही यावरून एकमेकांची तंगडी तोडण्याची भाषा संभाषणाला फोडणी देते. तरी बरं, मजकूर छापायला जाणार असल्यामुळे मी त्यातल्या शिव्या तांदळातल्या खडय़ाप्रमाणे वेचून बाहेर काढल्यात. (हे म्हणजे राजेश खन्नाला ‘आनंद’मधून बाहेर काढण्यासारखं होतं. राहिलं काय?) चांगला मित्र (चांगला मित्र हा शब्द अधोरेखित करावा. चांगली बायको मिळण्याइतकंच चांगला मित्र मिळणं दुर्मिळ आहे.) मिळणे हे भाग्याचं लक्षण आहे. मित्राच्या बाबतीत एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. त्याच्याशी बोलताना तोंड सांभाळून बोलावं लागत नाही. तो काय म्हणेल, त्याला काय वाटेल, असले अन्य नातेसंबंधात हमखास उद्भवणारे प्रश्न इथे संभवतच नाहीत. तुमच्या आनंदानं तो सुखावतो, तुमच्या दुःखानं तो खंतावतो. त्याच्या हेतूविषयी शंका घेण्याची वेळ सहसा येत नाही. सुखदुःखाची देवाणघेवाण करायला याहून विश्वासाची जागा नाही. पूर्वी या भूमिकेत देवाब्राह्मणांनी सहधर्मचारिणीची नियुक्ती केली होती. तीही त्यात समर्पित भावनेनं रमून गेली होती. काळ बदलला, पती-पत्नी हे एका घरात राहणारे अल्पपरिचित निवासी झाले. तिला स्वतःचे वेगळे प्रॉब्लेम्स होते, वर आणखी त्याचे प्रॉब्लेम्स कोण उरावर घ्यायला बसलंय? तुझं तू निस्तर, मी आहेच आगीत तेल घालायला…

मित्र ही माझी अशी संपत्ती आहे की, जी कोणी हिरावून घेऊ शकत नाही. हा एक शेर वाचा-

हम शतरंज नहीं खेलते
क्यों की
दुष्मनों की हमारे सामने बैठने की औकात नहीं है
और
दोस्तों के सामने हम चाल नहीं चलते

मित्रांबरोबर डावपेच आखावे लागत नाहीत, चाल खेळावी लागत नाही, व्यूहरचना लागत नाही, खोटारडेपणा करावा लागत नाही, या बोटावरची थुंकी त्या बोटावर करावी लागत नाही, चमचेगिरी करावी लागत नाही, काही लालुच दाखवावी लागत नाही, बचावाची शस्त्र्ाs काढावी लागत नाहीत, ‘शो’ करावा लागत नाही. आर्थिक क्षमता लपवावी लागत नाही, मोठेपणा मिरवावा लागत नाही, ‘मी आहे तसा आहे आणि तू आहेस तसा आहेस’ या मूलतत्त्वावर मैत्रीचा डोलारा उभा असतो आणि तो कोलमडण्याची सहसा भीती नसते.

कधीतरी कोणाच्या तरी बाबतीत हा घातपात होऊ शकतो. जवळचा मित्र दुरावला जातो. माझं दोन मित्रांबाबत असं झालंय. गाठभेट नाही, बोलणं चालणं नाही. त्यांच्या आठवणीशिवाय दिवस जात नव्हता. मनातल्या मनात मी त्यांच्या नावाची जपमाळ ओढत होतो. माझा ‘इगो’ मला मांडवली करण्यासाठी पुढाकार घेऊ देत नव्हता. त्यांची तीच अवस्था असणार. ‘इगो’! शेवटी मित्र कोणाचे? शेवटी देवानंच मध्यस्ती केली. आम्ही असे पोपटासारखे वसावसा बोललो की जणू मधली अबोल्याची वर्षे गेलीच नव्हती. काळजाला आराम पडला. मला तर वाटायला लागलंय की पूर्वी कधीही नव्हती एवढी आमची मैत्री आता घट्ट आहे. मध्यंतरी आमच्या मैत्रीला मिळालेल्या अर्धविरामानं आम्ही खूप काही शिकलोय, शहाणे झालोय. हे सोन्याचं डबोलं गमावणं म्हणजे काय हे आम्हाला पुरतं उमगलंय. नाही रे बाबा, ‘ये दोस्ती हम नहीं छोडेंगे’ हा शेर वाचा-
बर्ताव दोस्ती के हदसे गुजर गए है
या तो तुम बदल गए हो या हम बदल गए है

दुरावा आल्यानंतर, वितुष्ट निर्माण झाल्यानंतरही शायर आतलं, प्रेम, जिव्हाळा व आपुलकी विसरत नाही म्हणून तर तो ‘हम बदल गए है’ ही शक्यता बोलून दाखवतो.

माझ्या एका सर्वात जुन्या, व्हीलचेअरला खिळलेल्या मित्राला फोन केल्यावर मी सुरुवातच अशी करतो – ‘का रे, xxxxxx?’

त्याच्या तोंडातून आनंदाचे चित्कार येतात. माझी अर्वाच्य शिवी सत्कारणी लागलेली असते. त्याच्या विकलांग जीवनात क्षणभर आनंद निर्माण करणं एवढाच माझा हेतू असतो. तो यशस्वी झाला की मला आनंद होतो. अलीकडे तोही अशाच छप्परतोड शिवीनं माझं स्वागत करतो. मीही सुखावतो. ठराविक वयानंतर तुम्हाला शिवी हासडून सलगीनं तुमच्याशी बोलणारे कितीसे राहिलेले असतात? त्यांना नुसतेच धरून राहू नका तर कवटाळून बसा. ते तुम्हाला व तुम्ही त्यांना जिवंत ठेवत असता. वरना कब के मर गए होते। या दोन ओळी वाचा –

‘यारों, मुझे थोडे बाद में जलाना
मेरे दोस्तों को देर से आने की आदत है’

– [email protected]