श्रीलंका आता पूर्णपणे सुरक्षित- पोलीस महासंचालकांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। कोलंबो

श्रीलंकेत ईस्टर सणावेळी रविवार, 21 एप्रिलला झालेल्या आठ साखळी बॉम्बस्फोटांत आणि कटात सहभागी असलेले सर्व दहशतवादी मारले गेले आहेत आणि या कटाशी संबंधित इतर सर्व दहशतवादी पकडले गेले आहेत. आता श्रीलंका पूर्णपणे सुरक्षित आहे, असा दावा पोलीस महासंचालकांनी केला आहे.
पोलीस संचालक चंदना विक्रमरत्ने यांनी सोमवारी रात्री पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. बॉम्बस्फोटांच्या कटात प्रत्यक्ष सहभागी असलेले सर्व दहशतवादी एक तर मारले गेले आहेत नाही तर त्यांना अटक करण्यात आले आहे. त्याचबरोबर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष सुरक्षा योजना तयार करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

नॅशनल तौहिद जमातची मालमत्ता जप्त

बॉम्बस्फोटांची जबाबदारी इसिसने घेतली असली तरी श्रीलंका सरकारने हे सर्व बॉम्बस्फोट स्थानिक दहशतवादी संघटना नॅशनल तौहिद जमातने घडवले असल्याचे म्हटले आहे. आतापर्यंत जमातची सगळी ठिकाणे जप्त करण्यात आली आहेत. यात 140 मिलीयनची रोकड आणि 7 अब्जाची मालमत्तेचा समावेश आहे. दहशतवादी आणि बॉम्बस्फोटांशी संबंधित आतापर्यंत 73 जणांना अटक करण्यात आली आहे. यात 9 महिलांचा समावेश आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या जमातच्या संशयितांना 21 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

इसिसचा धोका कायम – पंतप्रधान

बॉम्बस्फोटांत सहभागी असलेले सर्व दहशतवादी जरी मारले गेले असले तरी इसिसचा धोका अजूनही संपलेला नाही, असे श्रीलंकेचे पंतप्रधान रनील विक्रमासिंघे यांनी मंगळवारी सांगितले. संसदेच्या विशेष सत्रात त्यांनी ही माहिती दिली. यावेळी देशाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. श्रीलंकेला असलेला धोका पूर्णपणे टळलेला नाही. आम्ही जागतिक दहशतवादाचे बळी आहोत, असे ते म्हणाले.