
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
#MeToo कॅंपेनच्या माध्यमातून महिला आपल्यावरील अत्याचाराविरोधात उघड बोलू लागल्यामुळे देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. यात दिग्गज अभिनेते नाना पाटेकर, आलोक नाथ, रजत कपूर, दिग्दर्शक विकास बहल, लेखक चेतन भगत, गायक कैलाश खेर यांच्यावर महिलांनी गैरवर्तवणुकीचे आरोप केले आहेत. हे वाद सुरू असतानाच यात आता अजून एका नव्या वादाची भर पडली आहे. विनोदी महिला कलाकार कनिझ सुर्का हिने #MeToo च्या माध्यमातून तिची सहकारी असलेली विनोदी कलाकार आदिती मित्तल हिच्यावर जबरदस्तीने चुंबन घेतल्याचा आरोप केला आहे. #MeToo कॅंपेनच्या माध्यमाने एका महिलेने महिलेवर अशा प्रकारचा आरोप केल्याची ही पहिलीच घटना आहे. यामुळे #MeToo कॅंपेनमध्ये अजून पुढे काय काय ऐकायला मिळेल याबदद्ल सोशल साईटवर तर्कवितर्क लढवले जात आहेत.
कनिझ हिने #MeToo कॅंपेनच्या माध्यमातून सोशल साईटवर एक पोस्ट टाकली आहे. ‘2016 साली अंधेरीत येथे एका कार्यक्रमादरम्यान आदिती अचानक स्टेजवर आली आणि तिने माझे जबरदस्तीने चुंबन घेत तिची जीभ माझ्या तोंडात टाकल्याचा आरोप केला आहे. यावेळी शेकडो प्रेक्षक आणि इतर विनोदी कलाकारही तिथे उपस्थित होते. या घटनेने मी सुन्नच झाले. खूप अपमानित झाले. पण माझ्याकडे पर्यायच नव्हता’, असे कनिझने म्हटले आहे. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीच्या स्वत:च्या क्षमता आणि मर्यादा असतात तिने त्याचे उल्लंघन केल्याचे पोस्टमध्ये कनिझने म्हटले आहे.
मी थोडं धैर्य एकवटून तिला याचा जाबही विचारला. त्यानंतर तिने माझी माफीही मागितली. पण नंतर मात्र ती काहीच झालं नाही अशा अर्विभावात वागत होती. पण आता मात्र आदितीने आपली जाहीर माफी मागावी अस वाटू लागलंय. यामुळे दोन दिवसांपूर्वी मी एका म्युच्यूअल फ्रेंडच्या मदतीने तिला माझी जाहीर माफी मागण्याची विनंती केली. जेणेकरून माझ्या मनावरचा ताण कमी होईल. पण तिने माझ चुंबन घेतल्याच्या घटनेसच नकार दिला. माझ्याकडे याबदद्लचे पुरावे आहेत. आता मी गप्प बसणार नाहीये, असंही कनिझने म्हटले असून पुरूषांनी ही त्यांच्यासाठी संधी असल्याचे समजून स्वत:चं उखळ पांढरं करण्यासाठी याचा वापर करू नये असंही तिने बजावलं आहे.
— Kaneez Surka (@kaneezsurka) October 10, 2018

























































