अभिप्राय : कलात्मक कॅलिग्राफीचा स्पर्श

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>जयू भाटकर

दूरदर्शनचे माजी निर्माता, जाहिरात क्षेत्रातील यशस्वी कलासक्त जाहिरात व्यावसायिक आणि ज्येष्ठ कवी दीपक शेडगे यांच्या ‘स्पर्श’ या काव्यसंग्रहाच्या तिसऱया आवृत्तीचे प्रकाशनानिमित्त…

कवितांच्या प्रत्येक शीर्षकात अत्यंत चपखलपणे अक्षरमहर्षी स्व. कमल शेडगे यांची कलासक्त अक्षरी अदाकारी आणि कवी दीपक शेडगे यांच्या आंतरिक अनुभूतीतून, अलवार कविमनातून, प्रसंगी कवितेची पारंपरिक चौकट भेदून नवकवितेचा आनंद देणारा, संवेदनशील, भावस्पर्शी प्रतिभेचा हुंकार म्हणजे ‘स्पर्श’ काव्यसंग्रह. वेगळय़ा आकाराच्या या काव्यसंग्रहाचं मुखपृष्ठ अक्षरांचे बादशहा असणाऱया सुप्रसिद्ध अक्षरलेखनकार स्व. कमल शेडगे यांनी आपल्या अभिजात कॅलिग्राफीचा मुक्त आविष्कार संग्रहाच्या शीर्षकात करत वाचकाला एक सुखद आनंद दिला आहे. त्यांच्या अक्षरलेखनाने कविता शीर्षकांनी या काव्यसंग्रहातल्या 58 कवितांना रुपेरी साज चढवला आहे. ‘चित्र’ कवितेतील मी संन्यस्त एकटा, दूर क्षितिज  टेकलेले, डोळा लावलेले चित्र, आरशात फुटलेले या ओळी मनाची अस्वस्थता दाखविणाऱया, पण जीवनातल्या वाटेवरला प्रत्येक जण आपलं आयुष्य एकटाच जगत असतो याची आठवण करून देणाऱया आहेत.

‘आंबा’, ‘प्रश्न’, ‘सवय’, ‘स्वप्नपक्षी’, ‘वर्तुळ’, ‘स्पर्श’, ‘अथांग’, ‘थेंब’ या आणि अशा 58 कविता वाचताना वाचकाला कवितेच्या एका वेगळय़ा घराची सुखावह आनंदी सावली लाभते. ‘मोकळे केस’मधल्या ‘माझ्या हातातील घडय़ाळ, भिंतीवर टांगलेले कॅलेंडर, बेफाम होऊन उसळणारा समुद्र अन् मोकळे सोडलेले तुझे केस’ ही कविता रोजच्या शहरी जीवनात अलवारपणे ‘तिची’ सुखद आठवण करून देणारी आहे. 

‘मांजर’मध्ये हा कवी सांगतो, ‘शेजारीच तिचे पिल्लूही जमीन उकरून डाव्या पंजाने विष्ठा पुरतेय स्वतःची.’ या रचनेतून सभोवतालच्या समाजातलं वास्तव, त्याचं जीवनदर्शन जवळून घडतं. मानवी संवेदना आणि जीवन जगण्याची मनस्वी ऊर्मी याची प्रचीती ‘स्वप्न’, ‘आजचा दिवस’, ‘राणीस’, ‘आम्ही’, ‘मुखवटे’, ‘यापूर्वीही’, ‘कविता’, ‘तथास्तु’, ‘सावली’, ‘साद’, ‘मी असा मरताना’, ‘चॅप्लिन’, ‘कुंकू’, ‘अरे पावसा’ या कविता वाचताना येते.  प्रसंगी स्वगत, आत्मनिवेदन यांच्या अंगाने लिहित्या झालेल्या या कविता गद्य, पद्य संमिश्र धाटणीच्या असल्या तरी त्यांचा आंतरिक भावार्थ हा रसिक वाचकांच्या काव्यशिदोरीतला, हळुवार मनाला सुखद पहाटवाऱयाचा मनसोक्त आनंद देणारा आहे. 

‘दरवाजा’, ‘काळोख’, ‘बाप’, ‘दिशाहीन’, ‘दिवेलागण’, ‘पडाव’, ‘आठवणी’, ‘तू’, ‘बाग’, ‘कधीकाळी’, ‘गिटार’, ‘मी पाहतो’, ‘संध्याकाळ’, ‘नाते’, या कवितांमधून भावनिक द्वंद्र, समाजातली तटस्थ वृत्ती, मानवी नातेसंबंध, माणसाच्या मनातील विविध विचारांचे कंगोरे सर्व काही जाणवतं. मराठी साहित्य विश्वाला लाभलेला ‘स्पर्श’ कवितासंग्रह हे मराठी कवितेच्या राजवैभवी राजपथावरचं एक वेगळं पाऊल वाटतं. हा काव्यसंग्रह म्हणजे मराठी कवितेच्या प्रांगणात प्राजक्तांच्या फुलांचा अभिजात स्पर्श आहे.