व्यावसायिक गॅस सिलिंडर 24.50 रुपयांनी स्वस्त, मुंबईत 19 किलोसाठी मोजावे लागणार 1674 रुपये

वाढत्या महागाईने देशातील जनता हैराण झाली आहे. याचदरम्यान तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. त्यानुसार व्यावसायिक गॅस सिलिंडर 24.50 रुपयांनी स्वस्त झाला असून मुंबईत 19 किलोच्या सिलिंडरसाठी 1674 रुपये मोजावे लागणार आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचे दर मात्र ‘जैसे थे’ आहेत.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे नवे दर रविवारपासून लागू करण्यात आले. यापूर्वी मे महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 14.50 रुपयांनी कमी केली होती. त्यानंतर महिनाभरातच दुसऱ्यांदा कपात करून व्यावसायिक ग्राहकांना तेल कंपन्यांनी खूशखबर दिली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा यांसारख्या व्यावसायिकांना स्वस्ताईचा फायदा होणार आहे. सलग तीन महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली. मे महिन्याप्रमाणेच 1 एप्रिल रोजीसुद्धा व्यावसायिक गॅस सिलिंडर तब्बल 41 रुपयांनी स्वस्त झाला होता.

व्यावसायिक सिलिंडरचे नवे दर

दिल्ली – 1723.50 रुपये
मुंबई – 1674.50 रुपये
कोलकाता – 1826 रुपये
चेन्नई – 1881 रुपये

सर्वसामान्यांना दिलासा नाहीच!

व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत सलग तीन महिन्यांत घट झाली. याचा हॉटेल-ढाबा व्यावसायिकांना फायदा झाला. स्वस्ताईमुळे व्यावसायिक खूश होत असताना सर्वसामान्य जनतेला मात्र दरवाढीचे चटके सहन करावे लागत आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचे दर कित्येक महिने ‘जैसे थे’ आहेत. 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरसाठी मुंबईत 852.50 रुपये, दिल्लीत 853 रुपये, कोलकातामध्ये 879 रुपये, तर चेन्नईत 868.50 रुपये मोजावे लागत आहेत.