
कलम 370 हटवून जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट सुरू आहे. त्यातच जगभरातून पाकिस्तानला कोणत्याही प्रकारे पाठिंबा मिळत नसल्याने त्यांची अवस्था आणखी गंभीर झाली आहे. अखेर आपल्या देशातील जनतेचा सरकार विषयीचा राग कमी व्हावा या करता पाकिस्तान नको नको ती पाऊले उचलत आहे. ‘पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युषलेटरी अथॉरिटी’ (PEMRA)ने हिंदुस्थानात निर्मिती झालेल्या आणि हिंदुस्थानी कलाकार असलेल्या जाहिरातींवर बंदी घातली आहे.
टीव्हीवर हिंदुस्थानी कलाकार पाहताना पाकिस्तानातील जनतेच्या भावना दुखावल्या जात असल्याचे कारण देत जाहिराती बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युललेटरी अथॉरिटीने जाहीर केलेल्या एका परिपत्रकात तसे नमूद केले आहे. डेटॉल, सनसिल्क, सर्फ एक्सेलसह अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे.
हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्यानंतर पाकिस्तान अशी पाऊले उचलतो असे आधीही दिसून आले आहे. कारगिल युद्ध, मुंबईतील 26/11चा हल्ला, सर्जिकल स्ट्राईक, बालकोटमधील एअर स्ट्राईकनंतरही पाकिस्तानात हिंदुस्थानी चित्रपटे आणि जाहिरातींवर निर्बंध आणले होते. याआधी पाकिस्तानने समझोता एक्स्प्रेस, दिल्ली-लाहोर बससेवा बंद केली आहे. तसेच ईद आणि स्वातंत्र्यदिनी आंतरराष्ट्रीय सीमेवर दोन्ही देशांत होणाऱ्या मिठाईची देवाण-घेवाणही बंद केली आहे. पाकिस्तानच्या अशा धोरणामुळे त्यांनाच मोठा तोटा सहन करावा लागल्याचे याआधी देखील समोर आले आहे.
























































