स्मार्ट रेल्वे स्थानकांचा खर्च प्रवाशांकडून वसूल, रेल्वे कडून ‘युजर चार्ज’ आकारण्याची योजना

689

पब्लिक, प्रायव्हेट आणि पार्टनरशिप या तत्त्वावर रेल्वे मंत्रालय अनेक रेल्वे स्थानकांचा कायापालट करत आहे. ही स्थानके स्मार्ट बनवत आहे, परंतु या रेल्वे स्थानकांवरून ट्रेन पकडणार्‍यांना आणि स्मार्ट रेल्वे स्थानकांमध्ये उतरणार्‍यांना आता अतिरिक्त शुल्क म्हणजेच युजर चार्ज द्यावा लागणार आहे. त्यासाठीची योजना रेल्वे मंत्रालय तयार असून देशभरातील नऊ मोठ्या रेल्वे स्थानकांसाठी हे अतिरिक्त शुल्क असेल. ही रेल्वे स्थानके स्मार्ट झाल्यानंतरच हे शुल्क आकारण्यात येईल, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश आंगडी यांनी सांगितले. स्मार्ट रेल्वे स्थानकांचा खर्च या अतिरिक्त शुल्कातून वसूल करण्यात येणार असल्याचे आंगडी यांनी सांगितले.

‘पीपीपी’अंतर्गत हबीबगंज आणि गांधीनगर रेल्वे स्थानके विकसित करण्यात येत आहेत. रेल्वे स्थानकांसह या ठिकाणी मालमत्ताही विकसित करण्यात येणार आहे, परंतु बाजारभावानुसार या मालमत्तांना सध्या चांगला भाव मिळत नसल्याने आणखी रेल्वे स्थानके विकसित करण्यासाठी या कंपन्या हात आखडता घेत आहेत. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त कंपन्यांनी पुढे यावे यासाठी रेल्वे प्रवाशांवर युजर चार्ज आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या रेल्वे स्थानकांपासून सुरुवात

युजर चार्ज आकारण्याची सुरुवात नऊ रेल्वे स्थानकांपासून होईल. यात ग्वाल्हेर, सुरत, साबरमती, अमृतसर, नागपूर, डेहराडून, पुद्दुचेरी, तिरुपती आणि वेल्लोर यांचा समावेश आहे. ‘पीपीपी’ मॉडेलअंतर्गत देशभरात 400 रेल्वे स्थानके विकसित करण्यात येणार आहेत.

असा असेल युजर चार्ज

स्मार्ट रेल्वे स्थानकांतून ट्रेन पकडताना अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. ट्रेनमधून स्मार्ट रेल्वे स्थानकांमध्ये उतरताना अर्धे अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. हे लक्षात घेता जर दोन्ही रेल्वे स्थानके स्मार्ट असतील तर प्रवाशांना दोनदा अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. तिकीट काढतानाच त्यात अतिरिक्त शुल्क आकारण्यात येईल, असे आंगडी यांनी सांगितले. दरम्यान, किती अतिरिक्त शुल्क आकारण्यात येईल याबाबत सर्वेक्षण करूनच निर्णय घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या