
अभिनेत्री कंगना राणावतला अखेर ट्विटरवरील टिवटिव भोवली आहे. वांद्रे न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी कंगनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 124 अ (राजद्रोह) यासह विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदू आणि मुस्लिम समाजांमध्ये परस्परांविषयी द्वेष निर्माण होईल आणि जातीय सलोखा बिघडेल अशा हेतूने वारंवार ट्विट केल्याचा याचिकाकर्ते मुनावर अली सय्यद यांचा आरोप होता. अॅड. रवीश जमादार यांच्यामार्फत त्यांनी वांद्रे न्यायालयात तक्रार दाखल केली होती. आज वांद्रे न्यायदंडाधिकारी जयदेव घुले यांनी या याचिकेची गंभीर दखल घेतली आणि पंगना व तिची बहीण रंगोली यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. वांद्रे पोलिसांनी या दोघींविरोधात भादंवि कलम 153 (अ), 295 (अ) आणि 124 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. चौकशीत कंगना दोषी आढळली तर तिला अटक होऊ शकते, असे कायदेतज्ञांनी सांगितले.
कंगनाचे ट्विटस् न्यायालयात
याचिकाकर्ते मुनावर अली हे बॉलीवूडमध्ये कास्टिंग डायरेक्टर आहेत. त्यांनी न्यायालयात कंगनाच्या आक्षेपार्ह ट्विटचा तपशील सादर केला. पालघरमध्ये दोन साधूंची जमावाने हत्या केल्यानंतर त्यावर कंगनाने आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने तिच्या बंगल्यातील अतिक्रमण तोडले असता तिने ‘बाबर सेना’ असा उल्लेख करीत ट्विट केले होते. तिने हिंदू आणि मुस्लिम कलाकारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला. हे सर्व ट्विट पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी दखलपात्र गुन्हा दिसत असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायाधीश जयदेव घुले यांनी पोलिसांना एफआयआर नोंदविण्याचा आदेश दिला होता.
तरीही आणखी एक ट्विट
गुन्हा दाखल झाल्यानंतर कंगनाने आणखी एक ट्विट केले असून माझ्याविरुद्ध आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मला जास्त मिस करताय तर मी लवकरच तेथे परतत आहे, असे तिने म्हटले आहे.



























































