
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
ग्रामीण भागामध्ये आजही मोठ्या प्रमाणावर बोगस डॉक्टर बिनधास्तपणे प्रॅक्टीस करीत आहेत. त्यांची माहितीही दिली जात नाही. त्यांची माहिती तात्काळ द्या, अन्यथा तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या बैठकीत देण्यात आला.
जि.प. आरोग्य समितीची बैठक आज सभापती मीना रामराव शेळके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत बोगस डॉक्टरांची माहिती तात्काळ देण्याचे सांगण्यात आले. अनेक बैठकीत अधिकारी मुख्यालयी राहत नाही. भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन डॉक्टर असून, मुख्यालयी कोणीही राहत नसल्याची तक्रार स्वाती निरफळ यांनी केली. त्याचा अहवाल देण्याचे यावेळी सांगण्यात आले.औषधी खरेदी स्थानिक पातळीवर खरेदी करण्यासह विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीस स्वाती निरफळ, इंदुबाई सोनवणे, रेणुका शिंदे, सरला बनकर, शिवाजी ठाकरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांची उपस्थिती होती.
गटशिक्षणाधिकाऱ्यांचा पदभार काढा
सोयगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी चौरे यांच्याविरुद्ध तक्रारी वाढल्यामुळे त्यांचा पदभार काढून कारवाई करण्याचे आदेश जि.प. शिक्षण समितीच्या बैठकीत देण्यात आले. यावेळी सभापती मीना शेळके, बबन कुंडारे, सुरेश सोनवणे, मोनाली राठोड, पूनम राजपूत, सीमा गव्हाणे यांची उपस्थिती होती.























































