
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी सर्व अधिकारी, पदाधिकारी यांनी कामाला लागावे. संगमनेर, अकोले व पारनेर या तीनही तालुक्यांत आगामी 10 दिवसांत 100 टक्के लसीकरण झाले पाहिजे. याबाबत मी अधिकाऱ्यांना पुन्हा सांगणार नाही. ही शेवटची संधी देतो. ‘करो या मरो’ याप्रमाणे काम करा; नाहीतर कारवाईला सामोरे जा, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज या तीनही तालुक्यांतील अधिकाऱ्यांना दिला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासन जोरदार कामाला लागले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात संगमनेर, अकोले व पारनेर या तीन तालुक्यांतील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, संगमनेर पंचायत समितीच्या सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ आरगडे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, रामहरी कातोरे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते आदींसह तीन तालुक्यांतील विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, ‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढलेला आहे. लसीकरणाअभावी एकही मृत्यू होता कामा नये, याची सर्व अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. लसीकरणाबाबत काहीजणांचा गैरसमज आहे. लसीकरणामुळे अद्यापि कोणाचाही मृत्यू झालेला नाही, याबाबत जनजागृती करावी. लसीकरणामुळे कोणाचा मृत्यू झाल्यास त्यास जिल्हाधिकारी जबाबदार राहील, असेच नागरिकांना सांगा. ग्रामीण भागात जनजागृती करा, गर्दीचे ठिकाण शोधून या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्या. अधिकाऱ्यांना सर्व अधिकार दिलेले आहेत. तालुक्यातील सर्व सरपंचांना ‘झूम’ मीटिंग घेऊन लसीकरणाबाबत सूचना द्या, लसीकरण, तपासणी याबाबत वेगात काम करा,’ अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
राजेंद्र क्षीरसागर म्हणाले, ‘पुढच्या 10 दिवसांत पहिला डोस मिळाला नाही, असा एकही नागरिक दिसणार नाही, यासाठी काम करा. जिह्यातील 20 टक्के म्हणजे सुमारे सात लाख नागरिकांचे अद्यापि लसीकरण झालेले नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे.’
संगमनेरच्या तहसीलदारांना कानपिचक्या
जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांना कानपिचक्या दिल्या. ‘आपण प्रथम नागरिक असतो, नंतर तहसीलदार असतो. लोकांशी नम्रतेने वागा. त्यांची कामे नम्रतेने करा,’ असे तहसीलदारांना सुनावले. ‘आपल्याकडे काही तक्रारी प्राप्त होतात त्या अनुषंगाने बोलतो,’ असेही जिल्हाधिकारी म्हणाले.


























































