जिद्दीच्या जोरावर कायद्याचे शिक्षण पूर्ण, 100 टक्के दृष्टिहीन महिला न्यायाधीश होणार; केरळमध्ये न्यायाला नवी दृष्टी मिळणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट पूर्ण करता येऊ शकते, हे उघडपणे दाखवण्याचे काम एका अंध महिलेने केले आहे. केरळमधील एक 24 वर्षाची महिला न्यायाधीश होणार आहे. थान्या नाथन सी. असे या महिलेचे नाव आहे. न्यायाधीश बनून थान्या यांनी केरळच्या न्यायव्यवस्थेत इतिहास घडवला आहे. 100 टक्के दृष्टिहीन महिला असूनही त्यांनी  ब्रेल लिपी, स्क्रीन-रीडिंग तंत्रज्ञान आणि अपार जिद्दीच्या जोरावर त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.

न्यायाधीश होण्यापूर्वीपर्यंत थान्या कन्नूर जिह्यातील तालिपरम्बा येथे एक वकील म्हणून प्रॅक्टिशनर वकील म्हणून कार्यरत होत्या. 2013 साली राजस्थानचे ब्रह्मानंद शर्मा हे पहिले अंध न्यायाधीश बनले आहेत. जगातील पहिले 100 टक्के अंध न्यायाधीश सर जॉन अँथनी वॉल मानले जातात. सर जॉन अँथनी यांना 1991 मध्ये युनायटेड किंगडममध्ये चांसरी डिव्हिजनमध्ये उच्च न्यायालयाचे उप-मास्टर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ‘अंधत्व कोणत्याही उमेदवाराची न्यायाधीश बनण्याची पात्रता कमी करू शकत नाही,’ असे ऑक्टोबर 2025 मध्ये न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने एका सुनावणीवर निर्णय देताना म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने 25 नोव्हेंबर 2024 रोजी 100 टक्के दृष्टिहीन कायद्याच्या विद्यार्थ्याला 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या काॅमन लॉ एन्ट्रन्स टेस्ट पदव्युत्तर परीक्षा 2024-25 मध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली होती. कोर्टाच्या या निर्णयामुळे अंध मुलां-मुलींना न्यायाधीश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे केरळच्या थान्या नाथन यांना न्यायाधीश होण्याची संधी मिळाली आहे. त्या लवकरच न्यायाधीशपदी विराजमान होऊन न्यायदानाचे काम करतील.

कन्नूर विद्यापीठातून एलएलबी पदवी घेत तालीपरंबामध्ये वकील के. जी. सुनीलपुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. त्यांनी केरळ न्यायिक सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवला असून लवकरच त्या खंडपीठावर विराजमान होणार आहेत.