आयुष्मान भारत घोटाळा -188 हॉस्पिटलवर कारवाई, 20 कोटींचा दंड

केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘आयुष्मान भारत’ योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने संबंधितांवर कडक कारवाई केली आहे. अशी माहिती शुक्रवारी संसदेच्या सभागृहात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. एकाच मोबाईल नंबरवरून तब्बल 10 लाख लोकांच्या नावाची नोंदणी, मृत्यू झालेल्या व्यक्तींवर उपचार केल्याचे दाखवून पैसे लाटल्याचे ‘कॅग’च्या अहवालात उघड झाले होते. यावर केंद्र सरकारने संसद सभागृहात स्पष्टीकरण दिले आहे.

‘आयुष्मान भारत’ घोटाळाप्रकरणी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी शुक्रवारी संसद सभागृहात स्पष्टीकरण दिले. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत राज्याच्या आरोग्य एजन्सीने 5 ऑगस्टपर्यंत 287 कोटी रुपयांच्या 1.6 लाखांहून अधिक दाव्यांविरोधात उचित कारवाई केली आहे. 210 हॉस्पिटलला पॅनलवरून हटवले आहे. तसेच 188 हॉस्पिटलला निलंबित करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री मंडाविया यांनी सभागृहात सांगितले. दोषींविरोधात 20.71 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ज्यात 9.5 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.

आयुष्मान भारत योजनेतील घोटाळा रोखण्यासाठी, तसेच भ्रष्टाचाराची माहिती उघड करण्यासाठी ‘नॅशनल अँटी फ्रॉड युनिट’ची स्थापना करण्यात आल्याचेही ते यावेळी म्हणाले. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 23 सप्टेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश 12 कोटींहून अधिक गरीब आणि मागासलेल्या कुटुंबाला (जवळपास 55 कोटी लाभार्थी) दरवर्षी उपचारासाठी पाच लाख रुपयांची मदत केली जाते. परंतु, गेल्या काही वर्षांत या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असे कॅग’ने आपल्या अहवालात म्हटले. ‘कॅग’च्या अहवालानंतर केंद्र सरकारने शुक्रवारी संसदेत स्पष्टीकरण दिले आहे.

आयुष्मान भारतघोटाळा भाजपच्या राज्यात

 ‘आयुष्मान भारत’ योजनेत कोटय़वधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे ‘कॅग’ने उघड केल्यानंतर आता आम आदमी पक्षाने भाजपवर घणाघाती टीका केली आहे. शुक्रवारी पक्षाच्या मुख्य प्रवक्त्या प्रियंका कक्कड यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल चढवला. ‘आयुष्मान भारत’ योजनेत सर्वात जास्त भ्रष्टाचार उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांत झाला आहे. या तिन्ही राज्यांत भाजपची सत्ता आहे. 50 टक्के बोगस रुग्ण एकटय़ा उत्तर प्रदेशातील आहेत. केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींनी या योजनेचा खूप प्रचार केला. रिपोर्ट व्यवस्थित पाहिल्यास असे दिसते की, हिंदुस्थानातील करदात्यांचा पैसा भाजपच्या प्रचारासाठी वापरण्यात आला आहे, असा आरोप कक्कड यांनी केला. 26 हजार हॉस्पिटलमध्ये उपचार केल्याचे दाखवले, परंतु अनेक हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नाहीत, तपासासाठी एमआरआय मशीन, सीटी स्पॅन मशीन यांसारखी व्यवस्था नाही. मृत्युमुखी पडलेल्या लोकांवर उपचार करण्यात आल्याचे कॅगच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.