
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार लहानू कोम यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्यावर वापी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने आदिवासींचे हक्क आणि शैक्षणिक उन्नतीसाठी झटणारा लढवय्या हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
लहानू कोम हे 1959 पासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सक्रिय सदस्य व कार्यकर्ते होते. 10 नोव्हेंबर 1938 मध्ये डहाणू तालुक्यातील आगवण या गावात जन्मलेल्या कोम यांचा सुरुवातीचा प्रवास अत्यंत खडतर होता. शिक्षणानंतर त्यांनी गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील तलासरी तालुक्यातील हडळपाडा येथे शैक्षणिक सेवा आणि राजकीय कार्य सुरू केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ते अत्यंत कडवट, लढाऊ आणि एकनिष्ठ नेते होते. पक्षाचे ते माजी राज्य सचिव मंडळ सदस्य होते. अखिल भारतीय किसान सभेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. 1977 मध्ये ते लोकसभेची निवडणूक जिंकून खासदार झाले. याच काळात केंद्र सरकारच्या अनुसूचित जाती-जमातीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची निवड झाली. 1980 मध्ये जव्हार-तलासरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून ते विधिमंडळात निवडून गेले. सलग 15 वर्षे ते या मतदारसंघाचे आमदार होते. आदिवासींच्या मुला-मुलींना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी शैक्षणिक संस्था उभारल्या. त्यांच्या संस्थेतून लाखो आदिवासी मुले-मुली शिकून उच्च पदावर पोहोचले आहेत.
आज अंत्यसंस्कार
लहानू कोम यांच्या पश्चात पत्नी, पुत्र, कन्या, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. लहानू कोम यांचे पार्थिव उद्या गुरुवारी तलासरीच्या हडळपाडा येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे. त्यानंतर ते कॉम्रेड गोदावरी श्यामराव परुळेकर भवन या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कार्यालयात अंत्यदर्शनासाठी आणले जाईल. तेथून त्यांची अंत्ययात्रा निघेल. यावेळी त्यांना अखेरचा लाल सलाम करण्यासाठी महाराष्ट्रातील माकपचे नेते, कार्यकर्ते, महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे नेते, कार्यकर्ते व अन्य मान्यवर सहभागी होतील, अशी माहिती माकपच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य कॉम्रेड अशोक ढवळे यांनी दिली.