
मुंबईत भाजपच्या महापौराचा कार्यकाळ सुरू होण्याआधीच कंजेशन टॅक्स लावण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू आणि कुलाबा येथील भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुंबईतील वाहनांवर कंजेशन टॅक्स लावण्याची मागणी करणारे पत्र महापालिकेला पाठवले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, “मुंबईचं काहीही भलं न करता मुंबई आणि मुंबईकरांना फक्त लुटायचं, हीच भाजपची वृत्ती आहे. मुंबई देशाच्या तिजोरीत सर्वाधिक भर घालत असतानाही केंद्रातील भाजपच्या संपूर्ण कार्यकाळात अर्थसंकल्पात मुंबईसाठी कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही.”
ते पुढे म्हणाले की, उद्योग आणि रोजगार सातत्याने मुंबईबाहेर हलवले जात आहेत. “गेल्या 4 वर्षांत भाजपच्या राज्य सरकारकडून मुंबई लुटण्यासाठी रस्ते घोटाळा, सुशोभीकरण घोटाळा आणि अशा अनेक घोटाळ्यांना खुलेआम वाव देण्यात आला,” असा आरोपही त्यांनी केला.
आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले, “लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधीच कष्टकरी मुंबईकरांकडून आणखी पैसे उकळण्याची मागणी कशी करू शकतो? भाजप मुंबईचा आणि मुंबईकरांचा इतका द्वेष का करते?”
तसेच त्यांनी काही थेट प्रश्नही उपस्थित केले. “भाजपच्या कंत्राटदारांनी रस्त्यांची दुरावस्था करून उधळलेले पैसे मुंबईकरांना परत दिले जाणार का? खासगी बस कंपन्यांना फायदा होण्यासाठी BEST बससेवेत केलेल्या कपातीबाबत कर परतावा मिळणार का? खराब हवेच्या गुणवत्तेमुळे शरीरात जाणाऱ्या प्रत्येक धूलिकणासाठी भाजप कर परतावा देणार का?” तसेच मकरंद नार्वेकर यांच्या कंजेशन टॅक्स प्रस्तावाशी भाजप सहमत आहे का, असा थेट सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
मुंबईत भाजपच्या महापौराचा कार्यकाळ अजून सुरूही झालेला नाही आणि त्याआधीच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर ह्यांचे बंधू मकरंद नार्वेकर (कुलाबा येथील भाजप नगरसेवक) ह्यांनी मुंबईतील वाहनांवर Congestion Tax लावण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र महापालिकेला लिहिले आहे.
मुंबईचं काहीही…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 9, 2026


























































