
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका इंधन दरवाढीला बसून महागाईने सर्वसामान्यांच्या नाकीनऊ आणले आहेत. त्याविरोधात आता काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केला असून मुंबई काँग्रेसच्या वतीने आजपासून 17 जुलै या कालावधीत शहरातील 227 वॉर्डमध्ये निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, तर इंधन दरवाढीच्या विरोधात मुंबईतील 100 पेट्रोल पंपवर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय 9 ते 14 जुलै या कालावधीत संपूर्ण मुंबईतील 6 जिल्ह्यांमध्ये मुंबई काँग्रेसतर्फे सायकल यात्रासुद्धा काढण्यात येणार असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितले. या अभियानांतर्गत मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये म्हणजेच 227 वॉर्डमध्ये मुंबई काँग्रेसचे 10 कार्यकर्ते कोविड प्रभावित कुटुंबांना भेट देणार असून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेणार आहेत. दररोज 10 प्रत्येकी काँग्रेस कार्यकर्ते 10 कुटुंबांना भेट देणार आहेत. सदर अभियान 30 दिवस निरंतर सुरू राहणार आहे.




























































