
मराठा आरक्षणविरोधात न्यायालयीन लढाईत भाजपकडून रसद पुरवण्यात आली असून भाजपशी महाराष्ट्राशी दगाबाजी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. एवढेच नव्हे तर, या प्रकरणाचे नागपूर कनेक्शनही उघडकीस आणले आहे.
आरक्षणाच्या विरोधात लढणाऱ्या ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ या संस्थेचे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर सबंध उघड झाले आहेत. यात भाजप पदाधिकारीच अग्रेसर असल्याने मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत आरक्षणविरोधी लोक आणि संस्थांना रसद पुरवून भाजपनेच मराठा समाजाशी दगाबाजी केली आहे का, असा सवाल प्रदेश प्रवक्त्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला. सर्वोच्च न्यायालयात आरक्षणविरोधी लढाई लढणारे सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन या संघटनेचे थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कनेक्शन आहे. या संस्थेतील बहुसंख्य विश्वस्त हे आरएसएसशी संबंधित असून नागपूरचेच आहेत. त्याचबरोबर भाजपच्या संघाच्या कार्यामध्येही ते अग्रेसर असतात याचेही पुरावे समोर आले आहेत. या संस्थेचे संस्थापक डॉ. अनुप मरार हे भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे पूर्व विदर्भातील समन्वयक आहेत. त्यांनी स्वतःचा पत्ता या संस्थेचा पत्ता म्हणून नोंदवलेला आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनीच त्यांची समन्वयकपदी नियुक्ती केल्याचे सचिन सावंत यांनी सांगितले.
मुंबई उच्च न्यायालयात ही न्यायालयीन लढाई चालली होती त्यावेळी ही संस्था अस्तित्वात नव्हती. परंतु मुंबई उच्च न्यायालयात आरक्षणाच्या बाजूने निकाल लागल्यानंतर या संस्थेचे कामकाज सुरु झाले आणि ही संस्था प्रमुख्याने मराठा आरक्षण विरोधातच कार्यरत आहे असे कागदपत्रावरून दिसते. मराठा आरक्षण विरोधात चार याचिकाकर्ते या संस्थेने पाठवले असे या संस्थेच्या वेबसाईटवर नमूद आहे. डॉ. अनुप मरार हे मराठा आरक्षणाविरोधात त्यांच्या सहकाऱयाबरोबर नागपूरमध्ये मोर्चे काढत होते तरीही भाजपा पदाधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सदर संस्थेमार्फत नामवंत वकील मराठा आरक्षणाचा विरोध करण्यासाठी देण्यात आले होते. तसेच डॉ अनुप मरार यांचे देवेंद्र फडणवीस याच्यासह अनेक भाजपा नेत्यांशी संबंध आहेत. हे सर्व पाहता भाजपाने मराठा आरक्षण विरोधात रसद पुरवून मराठा समाजाशी दगाबाजी केली का? याचे उत्तर दिले पाहिजे अशी मागणी सावंत यांनी केली.
5 जूनच्या आंदोलनामुळे कोरोनाचा भडका उडाल्यास भाजपच सुपरस्प्रेडर!
5 जून रोजी भाजप पुरस्कृत आंदोलन केले जाणार आहे. भारतीय जनता पक्षाची ख्याती कोरोना सुपर स्प्रेडर म्हणून अगोदरच प्रस्थापित झालेली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना पाच राज्यांच्या निवडणुकीत सत्तापिपासू वृत्तीने भाजपाने मोठमोठय़ा सभा व रोड शो करून कोरोनाचा प्रसार केला. त्यामुळेच देशात कोरोनाचा हाहाकार उडाला. 5 जूनच्या आंदोलनानंतर जर महाराष्ट्रात कोरोनाचा भडका उडाला तर त्याला सुपर प्रेडर भाजपाचे वर्तनच जबाबदार असेल, असा इशारा सचिन सावंत यांनी दिला.





























































