
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नव्या दमाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नवी जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीत साधारणपणे सवाशे ते दीडशे पदाधिकारी असायचे. यावेळी ती संख्या 400 वर पोहोचली आहे. 108 जणांना सरचिटणीस बनवले गेले आहे. कार्यकारिणीमध्ये मुंबईतील 20 जणांचा समावेश आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्षाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर नवी कार्यकारिणी बनवण्यासाठी अभ्यास केला. सर्व जातीधर्मांना कार्यकारिणीत स्थान मिळावे याची काळजी त्यांनी घेतली. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मान्यतेनंतर नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राजकीय व्यवहार समितीमध्ये 38 ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांचा समावेश आहे. त्यात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात अशी नावे आहेत. 16 वरिष्ठ उपाध्यक्ष, 38 उपाध्यक्ष, 108 सरचिटणीस, 95 सचिव, 87 कार्यकारी समिती सदस्यांचा कार्यकारिणीत समावेश आहे. पक्षाचे सर्व खासदार आणि आमदार या कार्यकारिणीमध्ये आहेत. खजिनदारपदाची जबाबदारी पुण्याचे अभय छाजेड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पक्ष प्रवक्तेपदी अनंत गाडगीळ, सचिन सावंत, अतुल लोंढे, धीरज देशमुख आणि गोपाळ तिवारी यांची नियुक्ती केली गेली आहे, तर माध्यम समन्वयकपदाची जबाबदारी श्रीनिवास बिक्कड यांच्याकडे कायम ठेवली आहे.
ओबीसी समाजाला अधिक प्नतिनिधित्व
इतर मागासवर्गीय समाजाला (ओबीसी) नव्या कार्यकारिणीत सर्वाधिक 40 टक्के प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. सर्वसाधारण वर्गातील 25 टक्के, अल्पसंख्याक समाजातील 19 टक्के, अनुसूचित जातीमधील 11 टक्के तर अनुसूचित जमातीमधील साडेचार टक्के पदाधिकाऱयांचा कार्यकारिणीत समावेश आहे.
108 सरचिटणीस नेमले
नव्या कार्यकारिणीत तब्बल 108 सरचिटणीस आहेत. यापूर्वी ही जबाबदारी फक्त चार-पाच नेत्यांवर दिली जायची. सरचिटणीसपदी नियुक्ती झालेल्या नेत्यांमध्ये झकीर अहमद, अॅड. रवी जाधव, संदेश काsंडविलकर, श्रीरंग बर्गे, दिप्ती चौधरी, याज्ञवल्क जिचकार, भावना जैन आदींच्या नावांचा समावेश आहे. नियुक्तीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱयांचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी अभिनंदन केले.