काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता बदलला, दिल्लीतील 9 कोटला रोडवर इंदिरा गांधी भवन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
congress

काँग्रेसचे नवीन मुख्यालय सेंट्रल दिल्लीत 9 कोटला रोडवर बनवले जात आहे. त्याचे नाव ‘इंदिरा गांधी भवन’ असे ठेवण्यात येणार आहे. नव्या मुख्यालयात काँग्रेसच्या स्थापना दिनापासून म्हणजे 28 डिसेंबरपासून कामकाज सुरू होईल. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते मुख्यालयाचे उद्घाटन होणार आहे.

गेल्या चार दशकांपासून काँग्रेसचे मुख्यालय दिल्ली येथील 24 अकबर रोडवर आहे. नवीन मुख्यालय सहा मजली असेल. ते दीनदयाळ उपाध्याय रोडवरील भाजप मुख्यालयजवळ असेल. त्याचे मुख्य द्वार कोटला रोडवर ठेवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. 24 अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयाशिवाय दिल्लीच्या 26 अकबर रोडवर काँग्रेस प्रदेश सेवा दल, 5 रायसिना रोडवर युवा काँग्रेस आणि एनएसयूआयचेही कार्यालय आहे. ते सगळे नव्या मुख्यालयात स्थानांतरित केले जाणार आहे. शहरी आणि निवासी विकास मंत्रालयाने 24 आणि 26 अकबर रोडसह लुटियन्स झोन येथील तीन कार्यालये रिकामी करण्याची नोटीस काँग्रेसला दिली होती. त्या जागेवर 1976 सालापासून काँग्रेसची कार्यालये आहेत.