
मुंबईला मूलभूत सोयीसुविधा देण्यात पालिका अग्रेसर आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत सांडपाणी प्रकल्प अद्ययावत झालेला नाही. अत्यंत प्राथमिक प्रक्रिया करून हे पाणी समुद्रात सोडले जाते. त्या पार्श्वभूमीवर, पालिकेने सांडपाणी प्रकल्प लवकरात लवकर अद्ययावत करून मुंबईकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने आज पत्रकार परिषदेत केली.
मुंबई महापालिका मुंबईकरांना शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते यासारख्या दर्जेदार सुविधा देते. मात्र, गेल्या काही वर्षांत काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. याकडे पालिका आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज आहे, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितले. तळोजा येथे पालिकेला डंम्पिंग ग्राऊंडसाठी मिळालेली 52 हेक्टरची जागा राज्य सरकारच्या मदतीने पालिकेने तात्काळ ताब्यात घेऊन डंम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी जगताप यांनी केली. मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांचे आरक्षण पाच वर्षांसाठी करण्यात आले आहे. ते बदलून पूर्वीप्रमाणे 10 वर्षांसाठी केले जावे, पश्चिम उपनगरात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर सुरू केल्यामुळे रहिकाशांना दिलासा मिळाला आहे. पूर्व उपनगरातही लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे पूर्व उपनगरातही त्याच धर्तीवर ट्रॉमा सेंटर बांधण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा, पालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोनात राज्य सरकार, पालिकेचे उत्कृष्ट काम
कोरोना रोखण्यासाठी राज्यातील महाआघाडीचे सरकार आणि पालिकेने सर्केत्कृष्ट काम केले आहे. याची दखल देश आणि जागतिक पातळीवर घेण्यात आली. मात्र, कोरोना काळातही विरोधक काही ना काही कारण काढून राजकारण करत आहेत. हे योग्य नाही, असे भाई जगताप म्हणाले.
























































