
घटस्थापनेचा मुहूर्त साधत काँग्रेसने रविवारी पहिली माळ लावली आणि विधानसभा निवडणुकीसाठी 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. विशेष म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच ही यादी जाहीर झाली असून त्यात 20 विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीचे प्रमुख मुकुल वासनिक यांनी सायंकाळी ही यादी जाहीर केली. यादीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रणीती शिंदे, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, नितीन राऊत आदींचा समावेश आहे. काँग्रेसचे परंपरागत आणि ज्या जागांवर राष्ट्रवादीशी वाद नाही अशा जागांची ही यादी आहे.
अशोक चव्हाण यांनी ओझर मतदारसंघातून आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मागितली होती, मात्र काँग्रेसने अशोक चव्हाण यांनाच रिंगणात उतरवले आहे. बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमधून, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून, लातूर शहरामधून अमित देशमुख, सोलापूर शहर मध्यमधून विद्यमान आमदार प्रणिती शिंदे, तर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरी येथून निवडणूक रिंगणात असणार आहेत.
पुण्यातून जगताप, बागवे
पुण्यातील पुरंदरमधून संजय जगताप, कॅण्टोन्मेंट मतदारसंघातून माजी मंत्री रमेश बागवे, भोर येथून विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य मतदारसंघातील विद्यमान आमदार शेख आसिक शेख रशीद यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर रावेरमधून शिरीष चौधरी, नागपूर पूर्वमधून डॉ. नितीन राऊत, वरोरामधून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कोल्हापुरात पाटील
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा मतदारसंघातून प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील व कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ऋतुराज पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून सांगली जिल्ह्यातील कडेगाव पलूस मतदारसंघातून विद्यमान आमदार विश्वजीत कदम, जतमधून विक्रम सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
घराणेशाहीची परंपरा कायम
काँग्रेसने घराणेशाहीची पंरपरा कायम राखली आहे. यात प्रामुख्याने नवापूरधून स्वरूपसिंह नाईक यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव शिरीष, रावेमधून ज्येष्ठ नेते मधुकरराव चौधरी यांचे चिरंजीव शिरीष यांना संधी देण्यात आली आहे. प्रभा राव यांचे भाचे माजी मंत्री रणजीत कांबळे यांना वर्ध्यातील देवळी मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. वरोर्यातून खासदार सुरेश धानोरकरांच्या पत्नी प्रतिभा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मुंबईतून कोण?
मुंबईतील भांडुप पश्चिम मतदारसंघातून सुरेश कोपरकर, अंधेरी पश्चिममधून अशोक जाधव, चांदिवलीमधून मोहम्मद आरिफ खान, चेंबूरमधून चंद्रकांत हंडोरे, वांद्रे पूर्वमधून झिशन सिद्दिकी, धारावीमधून वर्षा गायकवाड, सायन कोळीवाडातून गणेश यादव, मुंबादेवीमधून अमीन पटेल, कुलाबामधून अशोक जगताप यांना तर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधून रोहित साळवे, मीरा-भाईंदरमधून मुझफ्फर हुसैन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पृथ्वीबाबांचे तळ्यात–मळ्यात
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढवावी असा काँग्रेसचा दबाव आणि राष्ट्रवादीचा आग्रह आहे, मात्र पृथ्वीबाबांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. आज कराडमध्ये त्यांना कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, पण कोणती निवडणूक लढवणार याचा निर्णय दोन दिवसांनी घेऊ असे जाहीर केले. काँग्रेसच्या पहिल्या यादीत नाव नसल्याने ते आता लोकसभा लढवणार की विधानसभा याकडे लक्ष लागले आहे.





















































