मुंबईकरांच्या मदतीसाठी काँग्रेसचे सहा टास्क फोर्स, मुख्य कार्यालयात उभारणार नियंत्रण कक्ष

प्रातिनिधिक फोटो

कोरोना महामारीशी दोन हात करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. त्यानुसार मुंबईकरांच्या मदतीसाठी मुंबई शहर आणि उपनगरात सहा टास्क फोर्सची नियुक्ती केली आहे. तसेच त्यांच्यामध्ये समन्वय ठेवण्यासाठी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू केला आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली असून संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुंबईकर हवालदिल झाले असून कोविडबाधित रुग्णांना सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी काँग्रेसने सहा टास्क फोर्सची नियुक्ती केली असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्येक टास्क फोर्सला एक कार्डियाक ऍम्बुलन्स मुंबईकरांच्या सेवेसाठी देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 24 तास ऑक्सिजन आणि तज्ञ अटेण्डण्ट असणार आहे.

तसेच मुंबई काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येत आहे. कंट्रोल रूमचा हेल्पलाइन क्रमांक 022-22621114 आहे. टास्क फोर्समध्ये माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, वरिष्ठ पदाधिकाऱयांचा समावेश करण्यात आला असल्याचे भाई जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी 10 मेपर्यंत मुंबई काँग्रेसतर्फे 10 हजार बाटल्या रक्त संकलन करण्याचा संकल्प करण्यात आला असून आतापर्यंत 1500 बटल्या रक्त जमा झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या