
मोदी सरकारची उद्योगपती गौतम अदानींवर विशेष मेहरबानी आहे. यामुळेच एसबीआय, एलआयसीमधील जनतेचा पैसा मनमानी पद्धतीने अदानींच्या पंपन्यात गुंतवला गेला. मात्र, अदानी घोटाळ्यामुळे जनतेचा पैसा बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जनतेचा आवाज राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे पोहोचवण्यासाठी मुंबई काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी गिरगाव चौपाटी ते राजभवन या दरम्यान मोर्चा काढण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, चरणसिंग सप्रा आदी उपस्थित होते.


























































