
गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निर्णयाकडे काँग्रेसजन डोळे लावून बसले होते त्या काँग्रेसच्या नव्या अध्यक्षपदाचा मुहूर्त आज अखेर एकदाचा मुकर्रर करण्यात आला. येत्या जून महिन्यात काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळेल, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीवरून पक्षात असलेली धुसफूस थांबली आहे असे वाटत असतानाच आजच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत पक्षातील मतभेद पुन्हा उफाळून आले. काँग्रेससाठी पूर्णवेळ अध्यक्ष हवा, या मागणीवरून आग्रही असणारे राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांच्यावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी चांगलीच आगपाखड केल्याचे सूत्रांनी सांगितले. दर सहा महिन्यांनी तुम्ही पूर्णवेळ अध्यक्ष द्या, असा घोषा लावता हे योग्य आहे काय, अशा शब्दांत गेहलोतांनी शर्मांना खडसावल्यानंतर शर्मांनी त्यांना प्रत्युत्तर दिल्याने बैठकीतील तणाव वाढला. अखेर अंबिका सोनी यांनी मध्यस्थी करून हा वाद सोडवला.



























































