
सामना ऑनलाईन, नांदेड
देशात नोटबंदी व्यापाऱ्यांवर जीएसटी लावत बळीराजाची दिशाभूल व बेरोजगारांना खोटे आश्वासन दिल्याने सर्वसामान्य माणूस हा व्यथित झाला आहे. या देशाच्या भल्यासाठी, देशाच्या ऐक्यासाठी, महिलांच्या हक्कासाठी आणि अल्पसंख्याकांच्या हितासाठी या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत महाआघाडीला विजयी करून पुन्हा एकदा देशाला स्थैर्य मिळवून द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी आज येथे केले.
इंदिरा गांधी मैदानावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, पीआरपी आणि मित्रपक्षाच्या महाआघाडीची महाराष्ट्रातील पहिली सभा आज बुधवारी झाली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, शेकापचे जयंत पाटील, पीआरपीचे जोगेंद्र कवाडे, नसिम खान, फौजिया खान, माजी मंत्री बस्वराज पाटील, माणिकराव ठाकरे, संपतकुमार, आमदार विक्रम काळे, आमदार अमर राजूरकर, माजीमंत्री कमलकिशोर कदम, गंगाधरराव कुंटूरकर, आमदार अमिता चव्हाण, आमदार वसंत चव्हाण, आमदार डी.पी. सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुलवामा येथे हल्ला झाल्यानंतर सर्व पक्षांची बैठक बोलाविण्यात आली. गृहमंत्री राजनाथसिंह या बैठकीला उपस्थित होते. मात्र खेद वाटतो की, देशाचे पंतप्रधान या बैठकीला उपस्थित नव्हते. गेल्या पाच वर्षांत झालेले दहशतवादी हल्ले पाहता, सीमेवरचा जवान सुरक्षित नाही, ४४ जवानांचे बलिदान झाले. दुसऱ्या दिवशीही दहशतवाद्यांनी हल्ला केला. ती परिस्थिती भयावह असल्याचे सांगून सर्वपक्षीय बैठकीला भाजपाचाच नेता देशाचे पंतप्रधान अनुपस्थित होते. तरीही आम्ही एकजुटीने या बैठकीतील विषयांना संमती देऊन देशाच्या संरक्षणाला प्राधान्य दिले, असे पवार म्हणाले. गेल्या पाच वर्षात देशातील सर्वसामान्य माणूस, व्यापारी, नागरिक, शेतकरी हतबल झाला आहे. नोटबंदीनंतर आणि जीएसटीनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा कोलमडून पडला आहे. खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करणाऱ्या या सरकारला खाली खेचण्याची गरज आहे. देशाला स्थैर्य येण्यासाठी, बेरोजगारांच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत महाआघाडीलाच विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी खासदार अशोक चव्हाण यांनी घणाघाती भाषणात मोदी सरकारच्या गेल्या साडेचार वर्षातील विविध घटनांचा उल्लेख करत जनतेला खोटी आश्वासने देऊन फसविणाऱ्या सरकारला जागा दाखविण्याची वेळ आली आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाला केवळ ३० टक्के मतदान झाले. मात्र अन्य पक्षांच्या मतांचे विभाजन झाले, त्यामुळेच मोदी सरकार सत्तेवर आले. त्यामुळे आता आम्ही सर्व मतभेद विसरून महाआघाडी बनविली आहे. घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या व जनतेची फसवणूक करणाऱ्या सरकारला आता जागा दाखविण्याची वेळ आली आहे.
छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’चा नारा दिला होता, मात्र आज देशाचे चित्र भयावह असून, जवानांना दहशतवादी हल्ल्याचा सामना करुन शहीद व्हावे लागते, तर शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात. नोटाबंदीसाठी रांगेत उभे राहून दीडशे लोकांचे जीव जातात, हे चित्र विदारक आहे. या सरकारच्या भूलथापांना बळी न पडता या निवडणुकीत महाआघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी धनंजय मुंडे, नसिम खान, जोगेंद्र कवाडे, बस्वराज पाटील, जयंत पाटील यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पांडागळे यांनी केले. आमदार अमर राजूरकर यांनी आभार मानले.






























































