
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 4 ऑक्टोबरला म्हणजे शुक्रवारी संपुष्टात येत आहे. पण तरीही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपाचा घोळ अजूनही कायम असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. कारण पंढरपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केल्याने पंढरपूरच्या जागावरून पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागावाटपाची बोलणी पूर्ण झाल्यावर दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची नावे जाहीर करायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके हे भाजप सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले. राष्ट्रवादीत प्रवेश होताच त्यांना पंढरपूरमधून उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादीने 2 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत भालके यांचे नाव आहे, पण तरीही काँग्रेसने पंढरपूरमधून शिवाजीराव काळुंगे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे पंढरपूरची जागा नेमकी कोणत्या पक्षाच्या उमेदवाराची आहे असा पेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. पण अर्ज माघारी घेण्याची मुदत संपण्याच्या आत पंढरपूरच्या उमेदवारीचे चित्र स्पष्ट होईल.
… तर काँग्रेसला रामराम करण्याचा दिवस दूर नाही, संजय निरूपम यांचे बंड
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पंकज भुजबळ यांना उमेदवारी
राष्ट्रवादी काँग्रेसने आज 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत पंकज भुजबळ (नांदगाव), उत्तम जानकर (माळशिरस), बबनदादा शिंदे (माढा) यांचा समावेश आहे. त्याशिवाय अभिषेक पाटील (जळगाव शहर), संग्राम गुलाबराव गावंडे (बाळापूर), प्रकाश डहाके (कारंजा), केवळराम काळे ( मेळघाट), धर्मरावबाबा अत्राम ( अहेरी), तारीक शमी ( दिग्रस), मधुसूदन केंद्रे (गंगाखेड), संतोष कोल्हे (कन्नड), दीपिका चव्हाण (बागलाण), सरोज अहिरे (देवळाली), सुरेश लाड (कर्जत), दिलीप मोहिते (खेड आळंदी), सुनील शेळके (मावळ), सुलक्षणा शिलवंत (पिंपरी), बाळासाहेब आजबे (आष्टी), यशवंत माने (मोहोळ), राजेश नरसिंग पाटील (चंदगड) यांना उमेदवारी दिली आहे.























































