… तर काँग्रेसला रामराम करण्याचा दिवस दूर नाही, संजय निरूपम यांचे बंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र आणि हरयाणाच्या विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. हरयाणामधील राड्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम हे तिकीट वाटपावरून नाराज असल्याचे दिसत आहे. तिकीट वाटपावर नाराजी व्यक्त करताना त्यांनी काँग्रेस सोडण्याचीही धमकी दिली आहे. गुरुवारी एकामागोमाक एक ट्वीट करत त्यांनी आपला रोष व्यक्त केला.

संजय निरुपम यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, ‘असे वाटते की काँग्रेस पक्षाला आता माझ्या कामाची आवश्यकता नाही. विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील जागांसाठी मी काही नावं सूचवली होती. त्यांना नावांना नकार मिळाला असल्याची माहिती मला मिळाली आहे. अशा स्थितीमध्ये मी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराचा भाग होऊ शकणार नाही. हा माझा अंतिम निर्णय आहे.’

ते आणखी एका ट्वीटमध्ये म्हणतात, ‘मला आशा आहे की पक्षाला रामराम करण्याची वेळ येणार नाही. परंतु पक्षनेतृत्व ज्या प्रकारे माझ्याशी वागत आहे, त्यावरून असे दिसते की तो दिवस दूर नाही’

हरयाणात राडा
याआधी हरयाणामध्ये तिकीट वाटपावरून राडा झालाहोता. हरयाणाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर यांच्या समर्थकांनी दिल्लीमध्ये सोनिया गांधी यांच्या घराबाहेर प्रदर्शन केले. काँग्रेसने जुन्या आणि एकनिष्ठ नेत्यांकडे डोळेझाकपणा केल्याचा आरोप तंवर यांनी केला होता. तसेच तिकीट 5 कोटींना विकल्याचा आरोपही त्यांनी केला.