लसीकरणाचे श्रेय कसले घेता, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाने 100 कोटी लसींचा टप्पा पार केल्याने मोदी सरकार उत्सव साजरा करीत आहे. लसीकरणामुळे लोकांचे जीव वाचले पण पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे. इंधन व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचे प्राण कंठाशी आले आहेत. त्याचेही श्रेय मोदी सरकारने घ्यावे, अशी घणाघाती टीका काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

देशात लसीकरणाने 100 कोटींचा टप्पा पार केल्याने केंद्रातील मोदी सरकार विजयोत्सव साजरा करीत आहे. पण काही काळापूर्वी कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. ऑक्सिजनअभावी लोकांचा मृत्यू झाला याचा विसर मोदी सरकारला पडला याची आठवण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने करून दिली आहे.

कच्च्या तेलाचे दर कमी तरीही…

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण म्हणाले की, 2014 पूर्वी कच्च्या तेलाचे दर जास्त असूनही पेट्रोल-डिझेलचे दर तुलनेत कमी होते आता कच्च्या तेलाचे दर कमी असूनही पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे. म्हणूनच आम्ही संपूर्ण राज्यात `वाह रे मोदी तेरा खेल, विमान से महंगा गाडी का तेल,’ अशी मोहीम राबवत आहोत असे सुरज चव्हाण म्हणाले.

महागाईचाही विक्रम

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, लसीकरणाने विक्रम केला आहे हे चांगले आहे. यामध्ये शास्त्रज्ञ, वैज्ञानिकांचे मोठे श्रेय आहे पण पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या दराने महागाईचाही विक्रम झाला आहे. तसेच काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही महागाईच्या मुद्द्यावरून केंद्रातील सरकारवर कडाडून हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव अपयशाचे स्मारक म्हणून नोंदवण्यात येईल, अशी टीका त्यांनी केली.