
सामना प्रतिनिधी । बारामती
लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’ 350 पर्यंत कशी पोहचली याच्या खोलात अद्याप गेलेलो नाही, परंतु आता त्या निकालावर चर्चा करत बसण्यापेक्षा आम्ही लागलीच विधानसभेच्या तयारीला लागणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, एकदा निकाल लागल्यावर त्यांना एवढ्या जागा का व कशा मिळाल्या याची चर्चा थांबवली पाहिजे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेबद्दल जनसामान्यांच्या मनात नाहक गैरसमज निर्माण होऊ शकतो. आपण निवडणूक पद्धतीवर विश्वास ठेवून निकाल स्वीकारले पाहिजेत. मान्यताप्राप्त पक्षांची निवडणूक आयोगाकडून बैठक घेतली जाते. या बैठकीत निकालासंबंधी भाष्य करण्याचा अधिकार आम्हाला असतो. तेथे आम्ही निश्चित या विषयावर बोलू.
राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्रितपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आमचे जागावाटपही ठरलेले आहे. फक्त मतदारसंघांबाबत चर्चा करणे बाकी आहे. ही चर्चा येत्या 15 दिवसांत संपवून प्रत्यक्ष कामाला लागू, असेही पवार म्हणाले.


























































