ईडीविरोधात काँग्रेस आक्रमक; संसदेचे कामकाज ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना अंमलबजावणी संचालनायलया (ईडी) ने चौकशीसाठी बोलावल्याच्या मुद्दय़ावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत आज सकाळीच जबरदस्त हंगामा झाला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.

लोकसभेत कामकाज सुरू होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला तसेच अंटार्टिका विधेयकही मांडण्यात येण्याची घोषणा संसदीय कामकाजमंत्र्यांनी केली. मात्र काँग्रेस सदस्यांनी वेलमध्ये येऊन जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. ‘तानाशाही नही चलेगी’ अशा घोषणा हे सदस्य देत होते. या सदस्यांना प्रत्युत्तर देणयासाठी संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी उभे राहिले. कायदा सर्वांसाठी सारखा आहे. सोनिया गांधी काय सुपर ह्युमन बिइंग आहेत काय, असा चिमटा जोशींनी काढल्यानंतर काँग्रेस खासदार अधिकच खवळले. त्यामुळे एपंदरीत रागरंग पाहून अध्यक्षांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.

राज्यसभेतही सभागृहाचे कामकाज सुरू होताच सोनिया गांधींविरोधातील कारवाईविरोधात काँग्रेस खासदारांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यामुळे राज्यसभेचे कामकाजदेखील तातडीने दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.