
काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच काँग्रेस नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष पद स्वीकारावे अशी मागणी केली आहे. ते म्हणाले की, ‘हिंदुस्थानची एकता, अखंडता तसेच प्रगतीमध्ये नेहरू -गांधी कुटुंबाने दिलेले योगदान अपूर्व आहे. देश व काँग्रेस पक्ष संघटित ठेवण्यासाठी पुढील काळातही त्यांच्या सक्रिय नेतृत्वाची नितांत गरज आहे. पक्षाला एकजीव ठेवण्याची, बांधून ठेवण्याची क्षमता केवळ गांधी कुटुंबाकडे आहे आणि इतिहासातही हे अनेकदा सिद्ध झाले आहे. या वास्तवाची जाणिव ठेवूनच पक्षाची पुढील वाटचाल झाली पाहिजे,’ अशोक चव्हाण यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.
चव्हाण म्हणाले, पक्षाच्या अध्यक्ष पदासंदर्भात काँग्रेस कार्यसमिती निर्णय घेईल. परंतु, राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष पद स्वीकारावे, अशी कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा आहे. राहुल गांधी हे सक्षम, संयमी व संवेदनशील नेते आहेत. सर्वसामान्यांच्या व्यथांना त्यांनी नेहमीच अत्यंत दूरदर्शीपणे व नेमकी वाचा फोडली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर व्यापक देशहिताची भूमिका परखडपणे मांडली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व त्यांनी करावे, ही आमची मागणी असल्याचे ते म्हणाले आहेत.
ते पुढे म्हणाले, सोनियाजी गांधी यांनी अडचणीच्या काळात काँग्रेस पक्षाला उभारी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युपीए-1 आणि युपीए-2 च्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना न्याय देणारे, देशाला विकासाची नवी दिशा देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय झाले. कोणतीही महत्वाकांक्षा न बाळगता केवळ कर्तव्यभावनेतून त्यांनी देश व काँग्रेसची सेवा केली. त्यामुळे पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत त्या योग्य व सर्वमान्य निर्णय घेतील, याचा मला पूर्ण विश्वास आहे.’ दरम्यान, लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि यानंतर सोनिया गांधी यांनी 1 वर्षांसाठी अंतरिम अध्यक्षपद स्वीकारले. मात्र त्यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपला असून पुढे त्या अध्यक्षपदावर राहण्यास उत्सुक नसल्याचे वृत्त आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता याच संदर्भात काँग्रेस वर्किंग कमिटीची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत नवीन अध्यक्ष कोण? यावर चर्चा आणि निर्णय होण्याची शक्यता आहे.


























































