शिवभक्त राहुल गांधी आता ‘श्री राम’ अवतारात, काँग्रेसच्या पोस्टरमुळे वादळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्र सरकराने सर्वोच्च न्यायालयात राम मंदिरासाठी कोणताही वाद नसलेली जमिन देण्यासाठी अर्ज केला असतानाच बिहारमध्ये काँग्रेसच्या एका पोस्टरने वादळ उठले आहे. पटनामध्ये लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये राहुल गांधी यांना चक्क प्रभू श्री रामाच्या अवतारात दाखवण्यात आले आहे.

पटनामध्ये काँग्रेसने 3 फेब्रुवारीला एक न आकांक्षा रॅली आयोजित केली आहे. या रॅलीसाठी पटनात विविध ठिकाणी ही पोस्टर्स लावण्यात आलेली आहेत. या पोस्टर्सवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना श्री रामाच्या अवतारात दाखवण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्यासह नवनिर्वाचित सरचिटणीस प्रियांका गांधी, सोनिया गांधी व अन्य काँग्रेस नेत्यांचेही फोटो दिसून येत आहेत. या पोस्टरवरून भाजपवर टिकास्त्र सोडण्यात आले आहे. ‘ते राम नाम जपत असतात, तू रामासारखे जगून दाखव’, असे भाजपला डिवचणारे कॅप्शन या फोटोवर छापण्यात आले आहे.

दरम्यान, गुजरात आणि कर्नाटक निवडणुकीदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विविध मंदिरांना भेटी दिल्या होत्या. तसेच नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीदरम्यानही ते मंदिर, चर्च आणि मशिदीला भेटी देताना दिसले होते. याच वेळी राहुल गांधी हे शिवभक्त रुपात दाखवणारे एक पोस्टरही लावण्यात आले होते. आता श्री राम अवतारात राहुल गांधी दिसल्याने हा एक पॉलिटिकल स्टंट असल्याची टिका विरोधकांनी केली आहे. जद(यू) प्रवक्ते राजीव रंजन यांनी, निवडणुकीआधी काँग्रेस हिंदू मतांसाठी आकर्षित करण्यासाठी हे असले उद्योक करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.