Lok Sabha Election : मोदींना या गुन्ह्यासाठी देश कधीच माफ करणार नाही; राहुल गांधी यांचा हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. आता त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदींनी आपल्या अब्जाधीश मित्रांचे 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. ‘नरेंद्र मोदी यांनी आपल्या अब्जाधीश मित्रांचे 1,60,00,00,00,00,000 म्हणजेच 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. एवढ्या पैशांमधून 16 कोटी तरुणांना 1 लाख रुपये वर्षभराच्या नोकरीतून मिळू शकत होते. 16 कोटी महिलांना 1 लाख रुपये वार्षिक देत त्यांच्या कुटुंबाचे आयुष्य बदलले जाऊ शकत होते. 10 कोटी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत अनेक आत्महत्या रोखल्या जाऊ शकत होत्या. संपूर्ण देशात 20 वर्षांपर्यंत 400 रुपयांनी गॅस सिलिंडर दिला जाऊ शकत होता. 3 वर्षांपर्यंत भारतीय लष्कराचा संपूर्ण खर्च केला जाऊ शकत होता. दलित, आदिवासी समाजाच्या प्रत्येक तरुणाची पदवीपर्यंतचे मोफत शिक्षण दिले जाऊ शकत होते. हे सर्व पैसे हिंदुस्थानवासीयांच्या वेदनेवर औषध बनू शकले असते. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना या गुन्ह्यासाठी माफ करणार नाही’, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.