
कर्नाटकातील सभेत राहुल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कॉंग्रेस नेते पवन खेरा ट्विटरवरून मोदींवर हल्लाबोल केला आहे.
‘नरेंद्र मोदीजी तुम्ही केवळ पंतप्रधान आहात, तुम्ही ना देश आहात ना देव आहात’, असा टोला पवन खेरा यांनी लगालवला. दक्षिण कोरियात बोलताना, ‘हिंदुस्थानात जन्म घेणे दुर्देवी आहे’, असं ते म्हणाले होते. त्यावेळी संपूर्ण जग ऐकत होते आणि मोदी हसत होते. तेव्हा देशाच्या लोकशाही बद्दल आदर नव्हता का? अशी खरमरीत टीका खेरा यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील सभेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ब्रिटनमधील भाषणावर टीका केली होती. हिंदुस्थान सर्वात मोठा लोकशाही देश आहे. देशाच्या लोकशाहीची मुळे आपल्या हजारो वर्षांच्या इतिहासाने जोपासली आहेत. मात्र, ब्रिटनमध्ये याच हिंदुस्थानच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे दुर्दैवी असून त्यामुळे देशाची बदनामी झाल्याचे ते म्हणाले होते. आता त्यांच्या त्या टीकेला काँग्रेस नेते पवन खेरा यांनी चोख शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.
आपकी नीतियों की निंदा कब से देश की निंदा हो गई?
आप सिर्फ़ एक प्रधानमंत्री हैं, ना आप देश हैं, ना भगवान हैं और ना ही सृष्टिकर्ता हैं। https://t.co/QeUOeuOq82— Pawan Khera 🇮🇳 (@Pawankhera) March 12, 2023
”नरेंद्र मोदीजी तुम्ही केवळ पंतप्रधान आहात, तुम्ही ना देश आहात ना देव आहात”, असं त्यांनी ट्विट केले आहे. पंतप्रधान मोदी जेव्हा म्हणतात, काँग्रेसने 70 वर्षात काहीच केलं नाही, तेव्हा ते तीन पिढ्यांचा अपमान करतात. बीबीसीवर छापे टाकताना त्यांना देशाच्या प्रतिमेची काळजी नव्हती. दक्षिण कोरियात बोलताना, ‘हिंदुस्थानात जन्म घेणं दुर्देवी आहे’, असं म्हणाले होते. तेव्हा त्यांना देशाच्या लोकशाही बद्दल आदर नव्हता का? असा सवाल पवन खेरा यांनी केला. तसेच पंतप्रधान मोदी यांना स्वत:बद्दल काही गैरसमज आहेत. ते स्वत:ला देव समजतात, पण त्यांनी हे लक्षात ठेवावं, की ते फक्त या देशाचे पंतप्रधान आहेत, देव नाहीत, असेही ते म्हणाले.




























































