‘आमचा अध्यक्ष तडीपार नव्हता’, काँग्रेसचा भाजपवर पलटवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

‘संविधानामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, पण कॉग्रेसच्या संविधानात कोणीही पक्षाचा अध्यक्ष होत नाही’, असा आरोप करणे भाजप आमदाराला चांगलेच अंगाशी आले आहे. भाजप आमदाराच्या वक्तव्यावर काँग्रेसने जोरदार पलटवार केला आहे. ‘काँग्रेसचे आत्तापर्यंत ७२ अध्यक्ष झाले, त्यातील केवळ चार जण गांधी घराण्यातील होते. आमचे सर्व अध्यक्ष चांगले होते. त्यातला एकही अध्यक्ष तडीपार, भ्रष्ट नव्हता, तुमचा अध्यक्ष बघा’, अशा शब्दात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा नामुल्लेख न करता काँग्रेसने भाजपची लक्तरे काढली.

राईनपाडा येथील नाथ पंथी डावरी समाजातील पाच जणांची निर्घृण हत्या झाल्याच्या विषयावर चर्चा सुरू होती. त्यावेळी भाजप आमदार आणि विधान परिषदेचे मुख्य प्रतोद भाई गिरकर यांनी मल्लीकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्याचा दाखला घेत संविधानामुळे चहावाले नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, पण काँग्रेसच्या संविधानात ठरावीक लोकांना अध्यक्षपद मिळते, इतर कोणालाही नाही असा आरोप केला. गिरकर यांच्या वक्तव्यावर भाई जगताप यांनी हरकत घेतली.

‘काँग्रेसमध्ये आत्तापर्यंत सर्व जाती धर्मातील ७२ अध्यक्ष झाले आहेत. त्यातील चार फक्त गांधी घराण्यातील होते. यातील एकही तडीपार किंवा भ्रष्ट नव्हता. तुमचा अध्यक्ष बघा’, अशी जबरदस्त टीका भाई जगताप यांनी केली. यानंतर भाई गिरकर यांनी मला १९७७ पूर्वीचं माहिती नाही असे म्हणत हा विषय बदलला.