
अशोक चव्हाण हे डरपोक असून मैदान सोडून पळाले आणि विरोधकांशी हातमिळवणी करून त्यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला. एवढं भित्रं असू नये, असा संताप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज व्यक्त केला. काँग्रेसने तुमच्यावर काय अन्याय केला? ईडी, सीबीआयला घाबरून भाजपमध्ये गेले का? जनतेला उत्तर द्या, असेही चेन्नीथला यांनी बजावले. भाजपने स्वीकारले असले तरी जनता अशोक चव्हाण यांना स्वीकारणार नाही, असे ते म्हणाले.
काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत गांधी भवन येथे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. अशोक चव्हाण यांना दोनवेळा मुख्यमंत्री, 15 वर्षे मंत्रीपद दिले. पक्षात नेतृत्व करण्याची संधी दिली. पण अचानक ते भाजपमध्ये गेले. याच भाजपने अशोक चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आदर्श घोटाळय़ाचा आरोप केला आणि आज ते भाजपात गेले. अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळय़ाचा आरोप मोदींनीच केला होता. मोदी-शहांना भेटले की भ्रष्टाचाराचे डाग पुसले जातात का, असा सवाल त्यांनी केला.
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, माजी मंत्री यशोमती ठाकूर, डॉ. विश्वजीत कदम, आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशीष दुआ, माजी खासदार हुसेन दलवाई, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, सरचिटणीस प्रमोद मोरे, प्रवक्ते राजू वाघमारे उपस्थित होते.
अशोक चव्हाणांना सवाल
1 काँग्रेस का सोडली ते सांगा?
2 ईडी आणि सीबीआयचा तुमच्यावर दबाव आहे का?
3 दोन वेळा मुख्यमंत्री पद,
15 वर्षे मंत्रीपद… पक्षाने सर्व दिले, मग आताच असं काय झालं की तुम्ही साथ सोडलीत?
राज्यसभा निवडणुकीसाठी रणनीती
राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला फटका बसू नये म्हणून उद्या (बुधवारी) विधान भवनात संध्याकाळी पक्षाच्या आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. रमेश चेन्निथला हे मुंबईत ठाण मांडून आहेत. त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आमदारांवर वॉच ठेवण्याची सूचना केल्याचे कळते. काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ 45 आहे. त्यापैकी सुनील केदार यांना मतदानाचा हक्क नाही. तर अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने काँग्रेसचे संख्याबळ 43 झाले आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी हे संख्याबळ पुरेसे असले तरी मते फुटू नये यासाठी पक्षाने प्रयत्न सुरू केले आहेत.
चव्हाण पक्ष सोडून गेले तरी इतर कुणीही जाणार नाही
अशोक चव्हाण काँग्रेस पक्ष सोडून गेले असले तरी इतर कोणीही जाणार नाही, असा दावाही चेन्नीथला यांनी यावेळी केला. महाविकास आघाडी मजबूत असून महाराष्ट्रात लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नांदेडमधील 17 नगरसेवकांनी चेन्नीथला यांची भेट घेऊन आम्ही पक्षासोबत असल्याचे आज सांगितले.
पुन्हा विचार करा
अशोक चव्हाण हे नेतृत्व करणारे नेते आहेत. भाजपामध्ये त्यांना नेतृत्वाची संधी मिळणार नाही. त्यांना शेवटच्या रांगेत बसावे लागेल. अजूनही बिघडलेले नाही. त्यांनी पुन्हा विचार करावा. परत काँग्रेसमध्ये यायचे असेल तर त्यांनी यावे. आम्ही स्वागतासाठी तयार आहोत.
दबावामुळे भाजपात गेले
अशोक चव्हाण हे विचाराचे पक्के आहेत. तरीही ते भाजपात गेले याचा अर्थ त्यांच्यावर दबाव असावा किंवा स्वार्थासाठी ते भाजपात गेले असावेत. जागृत जनता भाजपाला धडा शिकवेल.
पायावर धोंडा मारून घेतला
अशोक चव्हाण यांनी भाजपात जाऊन स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. भाजपाच्या राजकारणाला जनता पंटाळली असून जनताच त्यांची डोकी पह्डेल. अशोक चव्हाणांच्या जाण्याने आभाळ कोसळलेले नाही.
राष्ट्रवादी सर्वोच्च न्यायालयात
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष आणि पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा अयोग्य आहे. त्यामुळे त्यास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने सुप्रीम कोर्टात याचिकेद्वारे केली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात पुरावे म्हणून तब्बल 800 पानांची कागदपत्रे याचिकेसोबत जोडली आहेत.





























































