नरेंद्र मोदींच्या अपयशी परराष्ट्र धोरणाचे परिणाम आज देश भोगत आहे, ट्रम्प यांच्या व्हिसा निर्णयावरून काँग्रेची टीका

नरेंद्र मोदी यांच्या अपयशी परराष्ट्र धोरणाचे परिणाम आज देश भोगत आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिजा शुल्क १ लाख डॉलर (सुमारे ८८.१० लाख रुपये) इतकी वाढवण्याची घोषणा केली असून, ही वाढ २१ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार आहे. यावरूनच काँग्रेसने आपल्या अधीकृत X अकाउंटवरून पोस्ट करत ही टीका केली आहे.

काँग्रेसच्या अधीकृत X अकाउंटवरूनही मोदी सरकारला लक्ष्य करण्यात आलं आहे. काँग्रेसच्या X अकाउंटवरून केंद्र सरकारवर टीका करत लिहिण्यात आलं आहे की, “नरेंद्र मोदी यांचे मित्र ट्रम्प यांनी ‘एच-१बी व्हिसाचे’ शुल्क वाढवले ​​आहे. आधी एच-१बी व्हिसाची फी ६ लाख रुपये होती, जी आता ८८ लाख रुपये इतकी वाढवण्यात आली आहे.”

या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे की, “ट्रम्पच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका हिंदुस्थानला बसणार आहे. अमेरिकेत हिंदुस्थानींसाठी नोकरीच्या संधी कमी होतील. अमेरिकेतून हिंदुस्थानात येणाऱ्या पैशातही मोठी कपात होईल. हिंदुस्थानातील आयटी व्यावसायिकांच्या नोकऱ्या धोक्यात येतील. देशातील मोठ्या आयटी कंपन्या आधीच कर्मचाऱ्यांची कपात करत असल्याने हा धोका आणखी मोठा होईल. नरेंद्र मोदींच्या अपयशी परराष्ट्र धोरणाचे परिणाम आज देश भोगत आहे, हे स्पष्ट आहे.”