अतिवृष्टीग्रस्तांना भरीव मदत द्या, अन्यथा पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही!

राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केलेली मदत दिलासा देणारी नाही, तर तुटपुंजी आहे. एनडीआरएफचे निकष जुने आहेत. त्यामुळे दुप्पट नाही, तर त्यापेक्षा जास्त मदत देणे गरजेचे आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी आणि थट्टा करणारी आहे. अतिवृष्टग्रस्तांना भरीव मदत द्या, अन्यथा पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित आझादी गौरव पदयात्रेदरम्यान नाना पटोले संभाजीनगर येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाना पटोले म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना 15 हजार रुपयांची मदत देण्यात आली होती, मात्र ती मदत अपुरी आहे म्हणून आता सत्तेत असलेल्या भाजपच्या नेत्यांनी त्यावेळी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. आता जाहीर केलेली मदत दिलासा देणारी कशी? काँग्रेस पक्षाने अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईपोटी हेक्टरी 75 हजार रुपये देण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने मात्र केवळ 13 हजार रुपये जाहीर केले आहेत, ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. मदत देताना 3 हेक्टरची मर्यादा घातली आहे, ती सुद्धा अन्यायकारक असून ही मर्यादा काढून टाकावी, अशी मागणी त्यांनी केली.

त्यावेळी सरकारने अतिवृष्टी व मुसळधार पावसाने नुकसान होताच तातडीने 10 हजार रुपयांची रोख मदत जाहीर केली होती. नंतर पॅकेजही दिले होते, मात्र भाजप-शिंदे सेनेचे हे सरकार शेतकऱ्यांना मदतीच्या नावावर लॉलीपॉप दाखवून वाऱ्यावर सोडत आहे, हे दुर्दैवी असल्याचेही नाना पटोले यांनी यावेळी नमूद केले. राज्य सरकारमध्ये मलाईदार खाते मिळवण्यासाठीच खाते वाटप सध्या रखडलेले आहे. शिंदे गट आणि भाजप यांच्यात वाद सुरू आहे. प्रत्येकालाच मलाईदार खाते मिळावे यासाठी वाद सुरू असल्यामुळेच मंत्रिमंडळाचे खाते वाटप अजून जाहीर झाले नसल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

संभाजीनगरमधील आझादी की गौरव यात्रेनिमित्त आज गुरुवारी काढण्यात आलेल्या पदयात्रेत नाना पटोले यांच्यासह जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, माजी मंत्री अनिल पटेल, सेवादलाचे विलास औताडे, माजी आमदार एम.एम. शेख, नामदेव पवार, प्रदेश सरचिटणीस जितेंद्र देहाडे, डॉ. जफर खान, शहराध्यक्ष शेख युसुफ, इब्राहिम पठाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.